Thu, Feb 21, 2019 21:22होमपेज › Satara › मोतीच्या आठवणीने औंधकरांच्या मनात काहूर

मोतीच्या आठवणीने औंधकरांच्या मनात काहूर

Published On: Jun 18 2018 1:12AM | Last Updated: Jun 17 2018 8:39PMऔंध : वार्ताहर

मागील वर्षी दि. 14 जून रोजी औंध येथील सर्वांच्या  लाडक्या गजराजाला औंधवासियांनी भावनिक वातावरणात साश्रू नयनांनी निरोप दिला होता.  गुरुवारी या घटनेला एक वर्ष पूर्ण झाले. मात्र, गजराज उर्फ मोतीच्या आठवणीने एक वर्ष पूर्ण होऊनही मोतीच्या आठवणीने औंधकरवासियांच्या मनात काहूर उठत आहे.

औंधच्या गजराजाचे वय आजमितीला 71 वर्षे आहे. औंधच्या राजघराण्याने त्याच्यावर मनापासून प्रेम केले आहे. औंध संस्थानचे अधिपती कै.श्रीमंत श्रीपतराव पंतप्रतिनिधी यांच्या लग्नामध्ये हा हत्ती भेट देण्यात आला होता.  त्यामुळे मागील पाच दशकांपासून औंधचे व मोती ऊर्फ गजराजाशी एक आगळेवेगळे नाते जुळले होते.

पण पेटा याप्राणी मित्र संघटनेने औंधचा  गजराज मथुरा केअर सेंटरमध्ये ठेवण्याची मागणी मागील वर्षी केल्याने 14 जून 2017 रोजी हत्तीची रवानगी करण्यात आली. अनेकांना मोतीने लळा लावला होता. औंधकरांना मोतीचे दर्शन झाले नाही, असा एकही दिवस गेला नव्हता. पण एक वर्षापासून सर्व काही सुनेसुने वाटू लागले आहे.

किंग ऑफ एलिफंट

औंधचा देखणा मोती हत्ती मथुरा येथील  वाईल्ड लाईफ केअर सेंटरमध्ये सुखरूप आहे. देखण्या मोतीचे किंग ऑफ एलिफंट असे नामकरण करण्यात आले आहे.