Tue, Mar 26, 2019 12:21होमपेज › Satara › दूध दरवाढीवर शासनाची चुप्पी

दूध दरवाढीवर शासनाची चुप्पी

Published On: Mar 03 2018 1:43AM | Last Updated: Mar 02 2018 10:33PMऔंध  : वार्ताहर

काही दिवसांपूर्वी दुग्धविकास मंत्री ना. महादेव जानकर यांनी दुध दरामध्ये वाढ होेणार असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर अजूनही कोणतीच दरवाढ झालेली नाही. त्यामुळे दुध उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्यामुळे शासन आमच्या तोंडाला नुसतीच पाने पुसणार का? असा सवाल बळीराजाकडून उपस्थित केला जात आहे. शेतीबरोबरच  दुग्ध व्यवसाय ही शेतकर्‍यांच्या जीवनाचा अविभाज्य अंग बनले आहे. पण मागील काही दिवसांमध्ये दुग्ध उत्पादन करणार्‍या शेतकर्‍यांना म्हणावा तसा दर मिळत नसल्याने  शेतकर्‍यांचा उत्पादन खर्चही निघत नाही अशी स्थिती आहे. खटाव तालुक्यात 225 हून अधिक दूध डेअरी आहेत.

तालुक्यात 25 ते 30 हजार लिटर दुधाचे नियमित संकलन केले जाते. पावसाळा व हिवाळ्यात याचे प्रमाण जास्त असते. यामध्ये देशी, जर्सी गायीच्या दुधाचे प्रमाण अधिक आहे. मागील काही महिन्यात दुधाचा दर वाढेल म्हणून शेतकरी वाट पाहत होते परंतु आजमितीला कोणत्याही प्रकारची वाढ झालेली नाही. गाईच्या दुधाचा दर सरासरी 30 रुपये प्रति लिटर  तसेच म्हैशीच्या दूधाचा दर 45 ते 50 रुपये प्रति लिटर करण्याची मागणी केली जात आहे.

दरम्यान, उन्हाळ्यामुळे ग्रामीण भागात चारा टंचाई जाणवू लागली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात ओल्या चार्‍याला  मागणी वाढली आहे. सध्या खपरी पेंडीच्या एका पोत्याचा दर 2 हजार ते 2 हजार 200 रूपये आहे. शेंगोळी पेंडीचे पोते 1 हजार 200 रूपयांवर गेले आहे. भुसा पोते 1 हजार रुपयाच्या घरात आहे. त्यामुळे शासनाने दरवाढीचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा, अशी मागणी होत आहे.