Thu, Jun 20, 2019 00:30होमपेज › Satara › बँका-पतसंस्थांच्या वसुलीने सारेच त्रस्त 

बँका-पतसंस्थांच्या वसुलीने सारेच त्रस्त 

Published On: Mar 05 2018 1:45AM | Last Updated: Mar 04 2018 8:14PMऔंध : वार्ताहर

मार्च महिना हा वसुलीचा महिना मानला गेल्या असल्याने    कर्जवसुलीच्या तगाद्याने  खटाव तालुक्याच्या ग्रामीण बाजारपेठांमध्ये ठंडा ठंडा, कुल कुल असेच वातावरण असून शेती उत्पन्नाचे दर पडल्याने बळीराजा चिंतेत आहे. मार्च      महिन्यामुळे  सध्या बाजारपेठांमध्ये थंडा माहोल असून अनेक ठिकाणी बँका, पतसंस्थांमार्फत कर्ज वसुली सुरू आहे.  त्याचा    परिणामही आर्थिक उलाढालीवर झाला आहे.  कर्ज वसुलीच्या तगाद्यामुळे ग्रामीण  भागात छोटयामोठया व्यापारी वर्गासह शेतकरी वर्ग मेटाकुटीस आला आहे.

त्यामुळे प्रत्येकजण कर्ज परतफेड कशी करायची? या विवंचनेत आहेत.    खटाव तालुका हा प्रामुख्याने अवर्षणप्रवण तालुका म्हणून ओळखला जातो. तालुक्याचा काही भाग पाण्याखाली आला असला तरीही अजून पासष्ट टक्के गावे निसर्गाच्या हवाल्यावरच आहेत. खरीप, रब्बी हंगामातील  पिकांच्या पेर्‍यावर जे उत्पन्न निघेल त्यावरच बळीराजा आपले वर्षाचे पुढचे गणित मांडत असतो. पण, यंदा निसर्गाने भरभरून दिले व दराने हातातून काढून नेले, अशी बळीराजाची अवस्था झाली आहे. यंदा बटाटा, उडीद, घेवडा, वाटाणा या खरीप हंगामातील पिकांचे मोठे उत्पादन झाले पण,  सर्वच पिक उत्पादनांचे दर आधारभूत किंमतीच्या खाली आल्याने अनेक ठिकाणी शेतकरी उत्पन्न निघूनही मोठ्या प्रमाणात कर्जबाजारी झाला आहे.

खरीप हंगामातील बटाटा अजूनही शेतकर्‍यांच्या ऐरणींमध्ये पडून आहे. अन्य भाजीपाल्याचीही तिच अवस्था आहे. याचा परिणाम ग्रामीण भागातील आर्थिक उलाढालीवर मोठया प्रमाणात झाला आहे. खटाव तालुक्यातील वडूज, पुसेगाव, मायणी, खटाव, औंध, पुसेसावळी या प्रमुख गावांमधील बाजारपेठांमधील उलाढाल मागील काही वर्षांच्या तुलनेत 50 ते 60 टक्क्यांवर आली आहे.  या सर्व बाबींचा विपरित परिणाम व्यापारी क्षेत्राबरोबरच बँका, पतसंस्थांच्या आर्थिक उलाढालीवर झाला आहे. आता मार्च महिना सुरु झाला असून वसुलीची कार्यवाही सुरु झाली आहे. सर्वत्र कर्जवसुलीचा तगादा सुरू आहे. बँका, पतसंस्थांबरोबरच सोसायकडूनही  कर्जवसुली, कर्जखाती नवी-जुनी करणे या बाबींना वेग आला आहे.

गावे, वाड्यांवस्त्यांवर जाऊन  वसुली पथके कर्जवसुली करू लागली आहेत. पण, सुल्तानी संकटामुळे हे कर्ज फेडायचे कसे? पैसे कोठून भागवायचे ही समस्या शेतकरी वर्गासमोर निर्माण झाली आहे. नोकरदार वर्गासमोरही बँकांची व अन्य देणेकर्‍यांची देणी कशी द्यावयाची? याची विवंचना आहे. या सर्व बाबींचा विपरित परिणाम आर्थिक उलाढालीवर झाला असून सर्वत्र ‘ठंडा ठंडा, कुल कूल’ असेच चित्र पहावयास मिळत असून आगामी लग्नसराईवरही याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.