Tue, Apr 23, 2019 09:43होमपेज › Satara › जिल्ह्यातील १९ वाळू ठेक्यांचे लिलाव

जिल्ह्यातील १९ वाळू ठेक्यांचे लिलाव

Published On: Apr 18 2018 12:56AM | Last Updated: Apr 17 2018 11:00PMसातारा : प्रतिनिधी

गेली अनेक महिन्यांपासून रखडलेल्या वाळू ठेक्यांचे जाहीर लिलाव आठ दिवसांत होणार आहेत. पहिल्या टप्प्यात ई-ऑक्शनने होणार्‍या लिलाव प्रक्रियेसाठी 19 वाळू ठेक्यांचे लिलाव काढण्यात येणार आहेत. या  ठेक्यांपैकी कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर व तांदुळवाडी हे प्‍लॉट शासकीय कामांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत.

राष्ट्रीय हरीत लवादाने नदीपात्रातील वाळू उपशावर बंदी घातली. त्यामुळे वाळू उपशावर मोठ्या प्रमाणावर निर्बंध आले. त्यामुळे वाळूची मोठी टंचाई निर्माण झाली. सरकारी आणि खाजगी कामांनाही वाळू उपलब्ध होवू शकली नाही. त्याचा परिणाम बांधकामांवर मोठ्या प्रमाणावर झाला. साधारण पाच महिन्यानंतरच काही अटींवर वाळू लिलाव काढण्यास परवानगी मिळाली आहे. मार्चनंतर कोरड्या पडलेल्या नद्यांमधील वाळू उपसा करण्यासाठी जिल्हा खणीकर्म विभागाने जिल्ह्यातील 19 वाळू ठेके लिलावासाठी घेतले आहेत.  

त्यामध्ये वाई तालुक्यातील ओझर्डे, एकसर, कराड तालुक्यातील नांदगाव, वाठार, काले-चपणेमळी, शिरवडे; कोरेगाव तालुक्यातील तांदुळवाडीतील 3, मंगळापूरमधील 2, रहिमपूरमधील 2, किरोली व बोबडेवाडी; फलटण तालुक्यातील शिंदेनगर तसेच माण तालुक्यातील वर म्हसवड अशा 19 वाळू ठेक्यांचा समावेश आहे. हे लिलाव कृष्णा, दक्षिणमांड, वांगणा, निरा तसेच माणगंगा या नद्यांमधील आहेत. लिलासाठीची अपसेट प्राईज 4 हजार 973 निश्‍चित करण्यासाठी पुणे आयुक्‍तांकडे प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे.  काही मंजुर्‍या बाकी असल्या तरी प्रस्तावांवर आठ दिवसांत निर्णय होण्याची शक्यता आहे. प्रस्तावांना मंजुरी मिळताच हे लिलाव ई ऑक्शनपध्दतीने काढण्यात येणार आहेत.

शासकीय कामांसाठी काही वाळू लिलाव राखीव ठेवण्यात येणार आहे. त्यासंदर्भात जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांच्या दालनात मंगळवारी सायंकाळी पाटबंधारे विभाग, सार्वजनिक बांधकाम विभागाची महसूल अधिकार्‍यांसोबत बैठक झाली. बैठकीस महसूल अतिरिक्‍त जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड, उपजिल्हाधिकारी अविनाश शिंदे, अधीक्षक अभियंता विजय घोगरे, सहायक अधीक्षक अभियंता सुलाखे, कार्यकारी अभियंता शशिकांत गायकवाड प्रमुख उपस्थित होते. या बैठकीत शासकी कामांसाठी दोन वाळू ठेके राखीव ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामध्ये कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर तसेच तांदुळवाडी हे वाळू ठेके राखीव ठेवण्यात आले आहेत. या वाळू ठेक्यांची मागणी करणारे पत्र दिल्यावर त्याचे  पैसे अपसेटप्राईजप्रमाणे महसूल विभागाकडे जमा केल्यावर संबंधित वाळू प्‍लॉट पाटबंधारे विभागाकरता राखीव ठेवण्यात येणार आहेत.

 

Tags : satara, satara news, sand, contracts, Auction,