Tue, Mar 26, 2019 22:36होमपेज › Satara › संत सखु मंदिर जीर्णोद्धारासाठी प्रयत्नशील

संत सखु मंदिर जीर्णोद्धारासाठी प्रयत्नशील

Published On: Aug 12 2018 1:03AM | Last Updated: Aug 11 2018 10:25PMकराड ः प्रतिनिधी

श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समिती पंढरपूरच्या माध्यमातून कराडमधील संत सखु मंदिरासह राज्यभरातील संतांच्या मंदिरांचा जिर्णोद्धार करण्यासाठी स्वतंत्र धोरण निश्‍चित करावे लागणार आहे. त्याचबरोबर संत सखु मंदिरासाठी समितीची स्थापना करून मंदिराच्या विकासासाठी कायमस्वरूपी व्यवस्था करण्याचे संकेत विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष ना. डॉ. अतुल भोसले यांनी दै.‘पुढारी’शी बोलताना दिले आहेत.

ना. डॉ. अतुल भोसले यांनी शनिवारी दै.‘पुढारी’च्या कराड कार्यालयास भेट दिली. प्रारंभी ना. डॉ. भोसले यांनी दै. ‘पुढारी’चे संस्थापक संपादक पद्मश्री स्व. डॉ. ग. गो. जाधव यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर बोलताना ना. भोसले यांनी यावर्षी विक्रमी 15 लाख भाविकांनी पंढरपूरला दर्शनासाठी हजेरी लावली होती. मात्र, मंदिर समिती, प्रशासन यांच्याकडून मंदिर परिसर, चंद्रभागा तट आणि पंढरपूर शहराच्या स्वच्छतेसाठी 10 हजार स्वच्छता दूत नेमण्यात आले होते. पंढरपूरमध्ये येणार्‍या सर्वच भाविकांना दर्शन होत नसल्याने वर्दळीच्या 12 ठिकाणी 100 फुटांचे एलईडी स्क्रिन लावले होते. 20 लाख लिटर मिनरल वॉटर, भोजन व्यवस्थाही अतिशय संदुर पद्धतीने राबवण्यात आली होती. 

विशेष म्हणजे गेल्यावर्षी भाविकांना दर्शन रांगेतून दर्शनासाठी लागणारा वेळ आणि यावर्षी लागलेला वेळ यात खूप मोठे अंतर होते. दर्शनासाठी यावर्षी 60 टक्के कमी वेळ लागला. भाविकांचे आरोग्य आणि वारीनंतर कचर्‍याचा निर्माण होणार प्रश्‍न याबाबतही मंदिर समितीच्या नियंत्रणाखाली मोठे काम झाल्याने कचर्‍याचा प्रश्‍न मिटला. याचा वारकर्‍यांसह स्थानिक लोकांना मोठा फायदा झाला. भविष्यातही भाविकांसह वारकर्‍यांच्या हितासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यास मंदिर समितीचे प्राधान्य राहणार असल्याचे ना. डॉ. अतुल भोसले यांनी दै. ‘पुढारी’शी बोलताना सांगितले. 

तसेच कराडमधील संत सखु मंदिराच्या विकासासाठी मंदिरांशी संबंधित लोकांची एक समिती स्थापन करून सर्वांना विचारात घेत मंदिराचा जिर्णोद्धार करण्याचा प्रयत्न राहणार आहे. याशिवाय पदे कायमस्वरूपी नसतात, त्यामुळे आपल्यानंतरही संत सखुसह राज्यभरात असलेल्या विविध संतांच्या मंदिरांच्या विकासासाठी निधी मिळावा म्हणून कायमस्वरूपी व्यवस्था करणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी आपण प्राधान्य देणार आहोत, असेही ना. भोसले यांनी यावेळी सांगितले. प्रारंभी दै. ‘पुढारी’चे ब्युरो मॅनेंजर सतीश मोरे यांनी ना. डॉ. अतुल भोसले यांचे स्वागत केले.

भक्‍त निवासाचे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत लवकरच उद्घाटन

पंढरपूर मंदिर समितीकडून भक्त निवासाचे महत्त्वकांक्षी काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे 1 हजार 200 भाविकांना मुक्कामाची व्यवस्था होणार आहे. राज्याच्या कानाकोपर्‍यातून वारकरी दर्शनासाठी पंढरपूरमध्ये येतात. त्यामुळे त्यांना होणारी गैरसोय टाळण्यासाठी मंदिर समिती प्रयत्नशील आहे. त्यामुळेच भक्त निवास तसेच अन्य उपाययोजनांना प्राधान्य देत वारकर्‍यांच्या हितासाठी मंदिर समितीच्या माध्यमातून प्रयत्नशील आहोत. भक्त निवासाचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते देशातील मान्यवरांच्या उपस्थितीत करण्याचा प्रयत्न असल्याचेही ना. डॉ. अतुल भोसले यांनी यावेळी सांगितले आहे.