Tue, May 21, 2019 04:05होमपेज › Satara › मुख्यमंत्री असताना ते झोपले होते काय?

मुख्यमंत्री असताना ते झोपले होते काय?

Published On: Jul 12 2018 1:43AM | Last Updated: Jul 11 2018 11:05PMरेठरे बु. : प्रतिनिधी

मलकापूरला नगरपरिषदेचा दर्जा द्यावा ही मागणी सर्वांत प्रथम आम्हीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. पण आम्ही नगरपरिषदेला विरोध करतोय, असा जावईशोध नगरपंचायतीमधील सत्ताधारी नेत्यांनी लावला. वास्तविक 2011 च्या लोकसंख्येच्या आधारे नगरपरिषद दर्जा दिला जाणार आहे. 2011 ते 2014 या काळात ते स्वत:च राज्याचे प्रमुख होते, मग त्यावेळी ते झोपले होते काय, आरोप श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीचे अध्यक्ष ना. डॉ. अतुल भोसले यांनी आ. पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव न घेता  केला. 

कार्वे (ता. कराड) येथे विविध विकासकामांच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.  य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन मदनराव मोहिते अध्यक्षस्थानी होते. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून शिवाजी महाराज पुतळा ते कोडोलीपर्यंतच्या रस्ता कामासाठी 54 लाख रूपये निधी मंजूर झाला आहे. या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन आणि श्री धानाई मंदिर येथे गोपाळनगर-शिंदेवस्ती मोळाचा मळा ते वडगाव हवेलीपर्यंत जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून 15 लाख रूपये खर्चून करण्यात आलेली रस्तासुधारणा, तसेच धानाई कमान ते भगवान गायकवाड यांच्या घरातपर्यंत 7 लाख रूपये खर्चून करण्यात आलेल्या बंदीस्त गटारकामाचे उद्घाटन ना.डॉ. भोसले यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी कृष्णा कारखान्याचे संचालक निवासराव पाटील, मोहनराव जाधव, पं.स. सदस्या अर्चना गायकवाड, सरपंच रेश्मा रसाळ, उपसरपंच रोहित जाधव, माजी उपसरपंच वैभव थोरात, माजी पं.स. सदस्य कैलास जाधव, पैलवान धनाजी पाटील, भाजपाचे तालुकाध्यक्ष हर्षवर्धन मोहिते, निवासआप्पा थोरात, प्रकाश थोरात, नारायण मुळीक, दत्तात्रय थोरात, चंद्रकांत थोरात आदी मान्यवर उपस्थित होते.