Tue, Nov 20, 2018 21:36



होमपेज › Satara › पळशी येथे वाळू माफियांचा पोलिसाला जीवे मारण्याचा प्रयत्न

पळशी येथे वाळू माफियांचा पोलिसाला जीवे मारण्याचा प्रयत्न

Published On: Apr 30 2018 1:46AM | Last Updated: Apr 29 2018 11:18PM



महसवड : प्रतिनिधी

पळशी (ता. माण) येथील माणगंगा नदीपात्रात अवैध वाळू उपसा करणार्‍यांना प्रतिबंध केला असता, 8 वाळू माफियांनी पेट्रोलिंग करणार्‍या पोलिस हवालदाराच्या अंगावर ट्रॅक्टर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी 5 जणांना अटक करण्यात आली असून तिघे पसार झाले आहे. 

याबाबत मिळालेली माहिती अशी, अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई करण्यासाठी पळशी, ता. माण येथे पोलिस गस्त घालत होते. त्यावेळी त्या परिसरात रामचंद्र खाडे हा इसम पोलिसांना दिसला. त्याच्याकडे चौकशी केली असता, तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. मात्र, त्याला पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर खाडे याने काही जण नदीपात्रातील वाळू उपसून ट्रॉलीमध्ये भरत असल्याची माहिती दिली. त्यानंतर पोलिस नदीपात्रात गेले असता या सर्वांना पोलिसांची चाहूल लागली. यानंतर वाळू भरत असलेली व्यक्ती पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. त्याच वेळी त्यामधील एका ट्रॅक्टर चालकाने हवालदार नीलेश कुदळे यांच्या अंगावर ट्रॅक्टर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या झटापटीत अंधाराचा फायदा घेऊन तिघे पसार झाले. 

या घटनेतील सुखदेव पांडूरंग नाकाडे (वय 42), लक्ष्मण हरिदास खाडे (वय 27), अविनाश बाळू माने (वय 25), रामचंद्र हरिदास खाडे (वय 30) चंद्रहार गुलचंद खाडे (वय 38) या पाच संशयितांना अटक करण्यात आली असून विकास खाडे, सागर माने आणि सागर जाधव हे फरार आहेत.