Fri, May 24, 2019 02:38होमपेज › Satara › वाईत धारदार शस्त्राने हल्ला

वाईत धारदार शस्त्राने हल्ला

Published On: Jul 28 2018 1:41AM | Last Updated: Jul 27 2018 10:53PMवाई : प्रतिनिधी

पूर्व वैमनस्यातून राहुल दादा गोळे (वय 30, रा. मुगाव, ता. वाई) यांच्यावर गुरुवारी रात्री 11.30 वाजण्याच्या सुमारास धारदार शस्त्राने वार करून त्यांना गंभीर जखमी केले. याप्रकरणी सिद्धेश घाडगे (रा. एकसर, ता. वाई) याला पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान, बाजारपेठेत हा प्रकार घडल्याने शहरात काही काळ तणावाचे वातावरण पसरले होते.

याबाबत पोलिस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी, राहुल गोळे हे गणपती घाट येथील पार्किंगवर कामाला आहेत. गुरुवार रोजी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास गणपती आळी येथील मराठा ज्वेलर्सच्या समोर ते आले. यावेळी सिद्धेश घाडगे याने अचानक धारदार शस्त्राने गोळे यांच्यावर वार केले. धारदार शस्त्राने हल्‍ला केल्यानंतर संशयित घटनास्थळावरुन दुचाकीवरून गणपती घाटाच्या दिशेने पळून गेला.

परिसरात चाकू हल्‍ला झाला असल्याचे समोर आल्यानंतर परिसरात तणावाचे वातवरण निर्माण झाले. घटनास्थळी रक्‍ताचा अक्षरश: सडा पडल्याने बघ्यांची गर्दी उसळली होती. दरम्यान, जखमी गोळे यांना स्थानिकांनी उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात नेले. प्राथमिक उपचार झाल्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले. या घटनेत ते गंभीर जखमी झाले असून उपचार सुरु आहेत.
याबाबतची फिर्याद गोळे यांचा मेहुणा सनी सुरेश जाधव याने वाई पोलीसात दिली असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक एम. एस. निंबाळकर करीत आहेत. दरम्यान पोलीसांनी एकसर येथून सिध्देश घाडगे याला ताब्यात घेतले असून त्याला न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.