Fri, Nov 16, 2018 09:14होमपेज › Satara › मिरची पूड टाकून एकावर कोयत्याने वार

मिरची पूड टाकून एकावर कोयत्याने वार

Published On: Mar 11 2018 11:59PM | Last Updated: Mar 11 2018 10:12PMसातारा : प्रतिनिधी

येथे बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात शनिवारी विनय अविनाश माने (वय 24, शाहूपुरी, सातारा) याने शनिवारी रात्री सातच्या सुमारास किरण सर्जेराव माने (26, रा. भक्‍तवडी, ता. कोरेगाव) याच्या डोळ्यात मिरची पूड टाकून कोयत्याने हल्ला केला. या थरारक घटनेनंतर नागरिकांनी संशयिताला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.

विनय माने हा काही दिवसांपूर्वी एमआयडीसीतील एका कंपनीमध्ये नोकरीस लागला होता. किरण माने हा पण तेथेच नोकरीला होता. दोन दिवसांपूर्वी कंपनी व्यवस्थापनाने विनयला बोलावून नोकरीचा राजीनामा लिहून घेतला होता. किरण माने यानेच काहीतरी सांगितले असेल, त्यामुळेच राजीनामा कंपनीने लिहून घेतल्याचा समज विनय माने याचा झाला होता. शनिवारी किरण माने हा बॉम्बे रेस्टॉरंट येथून वाढेफाट्याकडे निघाला होता.

त्या ठिकाणी विनय माने हा आला व त्याने सोबत आणलेली मिरचीची पूड किरणच्या डोळ्यात टाकली. यावेळी विनय माने याने किरणच्या पाठीत कोयत्याने वार केला. रस्त्यावर हा थरारक प्रसंग घडत असताना परिसरातील नागरिकांनी तत्काळ पोलिसांना या घटनेची माहिती दिली. युवकावरील हल्ल्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. परिसरातील नागरिकांनी संशयित युवकाला पकडले असतानाच पोलिस घटनास्थळी पोहचले.  संशयिताला ताब्यात घेवून परिसरातील गर्दी हटवली. किरण याने सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.