Tue, Jul 16, 2019 00:00होमपेज › Satara › ग्रामपंचायती होणार आता पेपरलेस

ग्रामपंचायती होणार आता पेपरलेस

Published On: Mar 20 2018 11:31PM | Last Updated: Mar 20 2018 11:31PMसातारा : प्रतिनिधी

ग्रामीण जनतेलाही जलदगतीने सुविधा देण्यासाठी आता गावपातळीवरील कारभार पेपरलेस होणार असून दि. 1 एप्रिलपासून ग्रामपंचायतीचे कामकाज ऑनलाईन होणार आहे. यासाठी ‘आपले सरकार’ योजनेतील  ई ग्रामसॉफ्ट नावाने संगणक प्रणाली विकसीत करण्यात आली असून जिल्ह्यातील सुमारे 1200 हून ग्रामपंचायती 1 एप्रिलपासून स्मार्ट होणार आहेत.

केंद्रशासनाच्या मार्गदर्शक सुचनेनूसार पंचायतराज संस्थांच्या कारभारामध्ये ई पंचायत प्रकल्पांतर्गत असलेले सर्व कामकाज संगणकीकृत करून एकसूत्रता व पारदर्शकता आणणे, नागरिकांना प्रशासकीय विभागांतर्गत आवश्यक असलेले सेवा दाखले तसेच इतर व्यावसायिक, बँकींग इत्यादी सेवा ग्रामीण जनतेला एकाच केंद्रावर त्यांच्या रहिवासी क्षेत्रातच मिळाव्यात. या हेतुने पंचायतराज संस्थांमध्ये आपले सरकार केंद्र प्रकल्प राबवण्याचा निर्णय झाला होता. त्यानुसार आपले सरकारच्या सेवा केंद्रातील ई ग्रामसॉफ्टद्वारे ग्रामपंचायतींचे 1 ते 33 नमुने संगणकाद्वारे मिळतील.

या संबंधीची संपूर्ण माहिती ग्रामसेवकाला भरावी लागणार आहे. त्यात प्रामुख्याने ग्रामपंचायतीचे अंदाजपत्रक, वार्षिक जमा खर्च, वार्षिक करमागणी व वसुली यादी,कामाचे देयक, मोजमाप वही, ग्रामपंचायत लेखापरीक्षण पूर्तता वही, स्थावर मालमत्ता माहिती, रस्त्याची माहिती,  जमिनीचे नोंदणी पुस्तक, कर्मचारी पगारपत्रक, कामाचे देयक, कामाचे अंदाजपत्रक नोंदवही, वार्षिक करपावतीची कामे ऑनलाईन होणार आहेत.

नगरिकांना देण्यात येणारे 1 ते 19 सेवाचे दाखले संगणक प्रणालीमधून देण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. त्यादृष्टीने नागरिकांकडून 20 रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे.ज्या केंद्रावर इंटरनेट कनेक्टिव्हिटी आहे. तेथे ऑनलाईन व इंटरनेट कनेक्टिव्हिटी नाही तिथे ऑफलाईन या दोन्ही स्वरूपात ई ग्राम सॉफ्टप्रणालीचे मॉडेल उपलब्ध करून देण्यात आले आहे. 1 हजार 494 ग्रामपंचायतीपैकी फलटण 124, सातारा 155, कराड 128, पाटण 133, माण 74, कोरेगाव 120, खंडाळा 63, खटाव 48, जावली 95, वाई 94, म‘श्‍वर 18 असे मिळून 1 हजार 200 ग्रामपंचायती एप्रिलपासून पेपरलेस होणार आहेत. 

Tags : Satara, Satara News, village, level, administration, paperless