Sat, Jun 06, 2020 18:58होमपेज › Satara › कराड बाजार समितीच्या संचालकांचा आत्महत्येचा प्रयत्न

कराड बाजार समितीच्या संचालकांचा आत्महत्येचा प्रयत्न

Published On: Jan 08 2018 1:16AM | Last Updated: Jan 08 2018 1:16AM

बुकमार्क करा
कराड : प्रतिनिधी

आत्महत्या करण्याची धमकी व फ्लॅटसह 10 लाखांची खंडणी मागत त्रास दिल्याने कराड बाजार समितीचे संचालक अशोकराव पाटील - पोतलेकर यांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची बाब समोर आली आहे. अलंकार (पुणे) पोलिसांकडे दाखल तक्रारीवरून कराड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा वर्ग करण्यात आला आहे. याप्रकरणी एका संघटनेच्या महिला कार्यकत्यार्ंसह पाच जणांविरूद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

अशोकराव पाटील-पोतलेकर यांच्यावर पुणे येथील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. रुग्णालयात उपचारावेळी पोलिसांना दिलेल्या जबाबात पोतलेकर यांनी म्हटले आहे की, ऑगस्ट 2015  मध्ये आपली एका महिलेशी ओळख झाली. याचा गैरफायदा घेण्याच्या उद्देशाने आपणास वेळोवेळी शारिरीक व मानसिक त्रास दिला जात होता. तसेच अ‍ॅट्रॉसिटीसह बलात्काराचा गुन्हा दाखल करून त्या गुन्ह्यात तडजोड करण्यासाठी माझ्याकडून 7 लाख 15 हजार रुपये घेतले होते. त्यानंतर तो गुन्हा मागे घेण्यात आला होता. 

मात्र, पुन्हा संबंधित महिलेने फ्लॅट व 10 लाख रुपयांची वेळोवेळी फोनवर व समक्ष भेटून मागणी केली. ही मागणी पूर्ण न केल्यास आपल्या घरासमोर पेटवून घेत आत्महत्या करू असे धमकी आपणास संबंधित महिलेने दिली होती. 

या धमकीला दाद न दिल्याने संबंधित महिलेने एका संघटनेच्या कार्यकर्त्यांना घेऊन आपल्या दुकानात तसेच घरात येऊन दमदाटी केली. संबंधित महिलेला आठवड्यला भेटलेच पाहिजे, अशा धमक्या देऊन भेटला नाहीस तर घरावर महिलांचा मोर्चा आणू, तुझा संसार उध्दस्त करू अशा धमक्या दिल्या. अशा केसेस कमी पैशात मिटत नसतात, असे म्हणत माझ्यावर दबाव आणला. त्याच दिवशी रात्री 8 च्या सुमारास फोन आला.

तू तिला भेटायला ये नाहीतर तिच्या हातात विषाची बाटली आहे. ती पोलिस ठाण्याबाहेर उभी आहे. तू भेटला नाहीस तर ती विष पिऊन आत्महत्या करेल, अशी धमकी दिली. त्यामुळे आपण त्याच दिवशी 28 डिसेंबरला पिकावर फवारण्यासाठी आणलेले औषध प्राशन केले. या घटनेनंतर 3 जानेवारी रोजी आपण शुध्दीवर आल्याचे पोतलेकर यांनी जबाबात म्हटले आहे. 

जून 2017 मध्ये अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा...

जून 2017 मध्ये कोरेगाव पोलिस ठाण्यात बलात्कार व अ‍ॅट्रॉसिटीचा आपल्याविरूध्द गुन्हा दाखल झाल्याचे समजले होते. त्यावेळी आर्थिक तडजोड करून ही केस मागे घेण्यास संबंधित महिलेने संमती दिली होती. त्यानुसार आपणास उच्च न्यायालयात अंतरिम जामीन मिळाला होता. त्याप्रमाणे त्या महिलेने उच्च न्यायालयात शपथपत्र दाखल केल्याचेही पोतलेकर यांनी जबाबात म्हटले आहे.