Sat, Feb 23, 2019 16:19होमपेज › Satara › सोलापुरात झाला...सातार्‍यात का नाही?

सोलापुरात झाला...सातार्‍यात का नाही?

Published On: Aug 23 2018 1:29AM | Last Updated: Aug 22 2018 8:56PMसातारा : सुनील क्षीरसागर

सातारा जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यात  पावसाने पाठ फिरवली आहे. या पार्श्‍वभूमीवर कृत्रिम पावसाचा प्रयोग दुष्काळी तालुक्यात करण्याची मागणी शेतकर्‍यांमधून पुढे येत आहे. परदेशातून अनेक वर्षापासून असे प्रयोग होत असल्याची माहिती पुढे आली आहे. त्याचबरोबर गत सप्ताहात सोलापूर जिल्ह्यात राज्य शासनाने हा प्रयोग केला असून तो यशस्वीही झाला आहे.

काही वर्षांपूर्वी महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रात ज्यावेळी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती त्यावेळी एकदा कृत्रिम पावसाचा प्रयोग केला होता. त्यावेळी विमानातून ढगांवर अत्यावश्यक रसायनांचा मारा केला होता. त्यावेळी काही ठिकाणी पाऊस पडून हा प्रयोग यशस्वीही झाला होता. आता तशीच परिस्थिती  सातारा जिल्ह्यातील माण तसेच खटावच्या काही भागात निर्माण झाली असून कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्याची मागणी पुढे येत आहे. 

कृत्रिम पावसाच्या निर्मितीसाठी सर्वांत आधी ज्या भागात पाऊस असण्याची गरज आहे त्या भागावर साधे ढग असण्याची आवश्यकता असते. कुठल्याही साध्या ढगातून पाऊस पडत नाही, त्यासाठी त्या ढगात खूप बाष्प असण्याची आवश्यकता असते. सर्वात प्रथम या ढगामध्ये अशा रसायनांचे बीजीकरण केले जाते की ज्यामुळे त्यांची घनता वाढून त्यात पाण्याचे प्रमाण वाढेल व पावसाची निर्मिती होईल. या रसायनांमध्ये सिल्वर आयोडाईड, पोटॅशियम आयोडाईड आणि कोरडा बर्फ याचा वापर केला जातो. या सर्वांमुळे बाष्पाची घनता वाढण्यास मदत होते. सध्या यात साध्या मिठाचा पण वापर केला जातो. या पद्धतीत तेथे असलेल्या ढगातील पाण्याच्या थेंबाचा आकार वाढून तो खाली पडण्यास मदत होते. आता ही घनता वाढते कशी? तर जी रसायने या ढगात बीजारोपण केली जातात ती रसायने त्या ढगात आधीच असलेल्या बाष्पाला चिकटून याचा आकार व वजन वाढवायला मदत करतात आणि मग पाऊस होतो, अशी माहिती या क्षेत्रातील जाणकारांनी दिली.

या कृत्रिम पावसासाठी सगळ्यात महत्वाचे म्हणजे ज्या भागात पावसाची गरज आहे त्या भागावर ढग असले पाहिजेत आणि ते ढग शोधण्यासाठी रडार यंत्रणा असायला हवी. दुसरे म्हणजे त्या ढगांपर्यंत पोहचण्यासाठी विमान किंवा रॉकेटही असले पाहिजे म्हणजे त्याद्वारे ढगात रसायनांचे बीजारोपण करता येते. तिसरे म्हणजे ढगांपर्यंत पोहचेपर्यंत ते ढग विरून जाण्याचीही दाट शक्यता असते. ज्या ढगात बीजारोपण केले जाते त्या ढगात जर मूळस्वरुपात बाष्पाचे प्रमाण कमी असेल तर याचा काहीच फायदा होत नाही आणि पाऊस पडू शकत नाही.  सर्वांत महत्वाचे म्हणजे ज्या ढगात आपण रसायनांचे बीजारोपण ज्या भौगोलिक प्रदेशासाठी करू त्याच भागात पाऊस होईल याची शक्यता फार धूसर असते, अशी शक्यता हवामान तज्ञांकडून व्यक्‍त केली जात आहे. 

माण - खटाव तालुक्यामध्ये मान्सूनपूर्व पाऊस मोठ्या प्रमाणावर पडला. त्यानंतर मात्र माण व खटाव तालुक्यात अनेक ठिकाणी पावसाने पाठ फिरवली असून या ठिकाणी अशा प्रयोगाची गरज असल्याची मागणी दुष्काळी जनतेकडून पुढे येत आहे.