Mon, Jun 17, 2019 18:14होमपेज › Satara › हिशेबात गोलमाल; कृत्रिम तळे मुजवले

हिशेबात गोलमाल; कृत्रिम तळे मुजवले

Published On: Dec 03 2017 1:03AM | Last Updated: Dec 02 2017 10:54PM

बुकमार्क करा

सातारा : प्रतिनिधी

सातारा नगरपालिकेने प्रतापसिंह सेंद्रिय शेती शाळेत खोदलेले कृत्रिम तळे घाईगडबड करून शनिवारी मुजवले. तळ्यांच्या खर्चाबाबत अधिकारी आणि पदाधिकार्‍यांकडून प्रचंड दडवादडवी केली जात असल्याने या कामात गोलमाल झाल्याचे स्पष्ट होत आहे. या संपूर्ण कामाची त्रयस्थ यंत्रणेकडून चौकशी करावी. तळ्यांचे अंदाजपत्रक फुगवणार्‍यांवर फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

सातारा नगरपालिकेने यावर्षी दगडी शाळा (सदरबझार), हुतात्मा स्मारक, कल्याणी शाळा परिसर याठिकाणीही कृत्रिम तळी काढली. या तळ्यांच्या कामावर  7 लाख 78 हजार 850 रुपये खर्च झाला. मात्र, इतर किरकोळ बाबींचा समावेश करून  सुमारे 32 लाखांची बिले काढली. हा भरसाट खर्च आणि वापरलेले साहित्य यांचा कुठेच मेळ बसत नसल्याने कृत्रिम तळ्यांच्या कामामध्ये प्रचंड भ्रष्टाचार झाल्याचे उघड होत आहे.

कृत्रिम तळ्यांचे काम एका सभापतीशी संंबंधित ठेकेदार संस्थेलाच कसे देण्यात आले?  शेती शाळेजवळ खोदलेल्या कृत्रिम तळ्याच्या आकारमानाचा विचार करता त्यावर सुमारे 6 लाख खर्च होऊ शकतो का?  तळ्यासाठी वापरलेल्या इतर साहित्यावर 24 लाख खर्च कसा काय झाला? याची माहिती देण्यात टोलवाटोलवी सुरु झाली आहे. खर्चाचा हिशेब दिला जात नाही. त्यामुळे या कामात भ्रष्टाचार झाल्याचे उघड आहे. त्यामुळे सातार्‍यात खोदलेल्या तळ्यांची संपूर्ण चौकशी करावी, अशी मागणी होत आहे. तळ्यांचे आकारमान, तळ्यासाठी वापरलेल्या साहित्याचे बाजारातील दर काय आहेत, याची तपासणी केली तर खरा प्रकार बाहेर येणार आहे.

मात्र, कृत्रिम तळ्यांचे पाणी चाखणार्‍यांना त्यामध्ये स्वारस्य नाही. कृत्रिम तळ्यातील खाबुगिरी बाहेर येवू नये आणि चौकशीचा ससेमिरा पाठीमागे लागू नये, यासाठी कृत्रिम तळी मुजवण्याची घाईगडबड सातारा पालिकेतील काहीजणांनी केली. तळी मुजवून भ्रष्टाचारावर पांघरुन घालण्याचा केविलवाणा प्रयत्न सातारा पालिकेने केला.  संबंधित विभागांकडून खर्चाचा तपशिल दिला जात नाही. अधिकारी, पदाधिकारी शनिवारी गायब झाले. खर्चाची माहिती देण्यास टाळाटाळ केली जात असल्यामुळे सातारा पालिकेच्या पारदर्शक कारभारावर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे.