Thu, Jul 18, 2019 00:27होमपेज › Satara › महाबळेश्‍वरमधील धनिकांची पळापळ सुरू

महाबळेश्‍वरमधील धनिकांची पळापळ सुरू

Published On: Jul 24 2018 1:09AM | Last Updated: Jul 24 2018 12:06AMमहाबळेश्‍वर : वार्ताहर 

राष्ट्रीय हरित लवादाने आता माथेरानपाठोपाठ महाबळेश्‍वरला आपले लक्ष केंद्रित केले असून राष्ट्रीय हरित लवादाच्या दिल्ली येथील फरिदाबाद न्यायालयाने पहिल्या टप्प्यात तालुक्यातील खासगी मालकीच्या वनसदृश मिळकतींमध्ये बेकायदेशीर बांधकाम केलेल्या दिग्गजांचा समावेश असून यामधील 33 मिळकतधारकांना अटक वॉरंट बजावल्याच्या ‘पुढारी’च्या वृत्ताने एकच खळबळ उडाली. त्या 33 मिळकतधारकांची पळापळ सुरू झाली असून जामिनासाठी त्यांनी धाव घेतली आहे. पोलिसांच्या कारवाईकडे लक्ष लागून राहिले आहे. 

केंद्र शासनाने महाबळेश्‍वर, पाचगणी ही पर्यटनस्थळे पर्यावरणाच्या दृष्टीने अतिसंवेदनशील म्हणून जाहीर केली असून येथील बांधकामाच्या नियमावलीत अनेक  बदल करण्यात आले. या बदलाची अंमलबजावणी काटेकोरपणे व्हावी, यासाठी येथे उच्चस्तरीय सनियंत्रण समिती गठीत केली. बांधकामाप्रमाणेच वन अधिनियमाची नियमावली कडक  करण्यात आली. असे असतानाही पालिका अथवा महसूल विभागातील अधिकारी यांना हाताशी धरून धनिकांनी वनसदृश मिळकतींमध्ये बेकायदेशीर बांधकामे सुरू ठेवली  आहेत. ही बाब पर्यावरणाच्या दृष्टीने घातक असल्याने बॉम्बे इनव्हायरल अ‍ॅक्शन ग्रुप या पर्यावरणवादी संस्थेच्या हेमा रमाणी यांनी 2016 मध्ये वनसदृश जमिनीवरील बेकायदेशीर बांधकामाबाबत दिल्ली येथील राष्ट्रीय हरित लवादाकडे तक्रार दाखल केली. या तक्रारीमध्ये हेमा रमाणी यांनी केंद्र सरकार, राज्य सरकार, नगररचना विभाग, जिल्हाधिकारी, महाबळेश्‍वर व पाचगणी नगरपरिषद यांना पक्षकार केले आहे. 

भूमिअभिलेख व महसूल विभागाने 2006 साली तालुक्यातील वनसदृश खासगी मिळकतींची पाहणी केली होती व तसा अहवाल शासनास सादर केला होता. बी ई ए जी या संस्थेने राष्ट्रीय हरित लवादाकडे केलेल्या तक्रारीमध्ये या अहवालाचा आधार घेतला आहे. 

हेमा रमाणी यांनी केलेल्या तक्रारीची हरित लवादाने गंभीर दखल घेतली असून पहिल्या टप्प्यात 33 वनसदृश मिळकतीमध्ये बेकायदेशीर बांधकाम करणार्‍या मिळकतधारकांना नोटीसा बजावल्या आहेत. यामध्ये माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या पत्नी सौ. निलम राणे यांच्यासह येथील हॉटेल व्यावसायिक प्रल्हाद नारायणदास राठी, रा़ दोघेही क्षेत्र महाबळेश्वर , महेश बाबुलाल पांचाळ , सलीम उस्मान वाईकर व चांद मोहम्मद वाईकर रा नाकिंदा, शिरिष मधुसुदन खैरे, खुर्शिद इस्माईल अन्सारी, सदानंद महादेव करंदीकर, विठ्ठल बाबू दुधाणे रा. सर्व भोसे , डॉ. सुनीला मोहन रेड्डी रा. मेटगुताड, पुजा गजानन पाटील रा. अवकाळी , संग्रामसिंह आप्पसाहेब नलावडे रा. भेकवली, मनिषा संतोष शेडगे रा. शिंदोळा, विठ्ठल दगडू गोळे, शांताराम परबती गोळे, केशव धोंडीबा गोळे (सर्व रा. भोसे), आसावरी संजीव दातार रा. दरे , आर्ची डॅनियल डिसोजा, खेमाजी नादजी पटेल, अतुल चिंतामणी साळवी, संदीप नंदकुमार साळवी, चंद्रशेखर चंद्रकांत साबणे, कुसूम प्रताप ओसवाल, मोलु लेखराज खोसला व राजन भालचंद्र पाटील रा. सर्व मेटतळे, शंकरलाल बच्चुभाई भातुथा रा. दुधोशी घोगलवाडी, मनोहर रामचंद्र शिंदे, संतोष हरिभाऊ जाधव, गिनात्री अशोक भोसले रा. सर्व कुंभरोशी आदी बँकींग, उद्योग, राजकीय, चित्रपट, सहकार, बांधकाम क्षेत्रातील दिग्गज धनिकांसह काही स्थानिकांचा समावेश आहे. 

सोमवारी याबाबतचे वृत्त ‘पुढारी’ने प्रसिद्ध केले. त्यानंतर एकच खळबळ उडाली. या सर्व धनिकांना अटक वॉरंट बजावण्यात आले असून महाबळेश्वर पोलिसांनी संबंधित धनिकांना संपर्क साधून कारवाईची माहिती दिली आहे. या सर्व धनिकांना 30 तारखेस दिल्ली येथील हरीत लवादाच्या न्यायालयात हजर राहण्यास बजावण्यात आले आहे. या सुनावणीस सातारा जिल्हाधिकारी यांना देखील समक्ष हजर राहण्याचे आदेश न्यायालयाने काढले आहेत. राष्ट्रीय हरित लवादाच्या या कारवाई मुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ माजली असून धनिकांची पोलिस ठाण्यात जामीन देण्यासाठी एकच धावपळ सुरू झाली आहे.