Thu, Jul 18, 2019 21:00होमपेज › Satara › औंधवासीयांच्या काळजाचा चुकतोय ठोका

औंधवासीयांच्या काळजाचा चुकतोय ठोका

Published On: Jun 13 2018 9:15AM | Last Updated: Jun 13 2018 12:14AMऔंध : सचिन सुकटे

औंध ते खरशिंगे रस्त्यावर सोमवारी झालेल्या दुचाकींच्या भीषण अपघातात दोन युवकांचा नाहक बळी गेला असून या अपघाताने  प्रत्येक कुटुंबासाठी जीव हा किती अनमोल असल्याचे अधोरेखित केले असून तरूणाई, दुचाकी, चारचाकी वाहनधारक, चालकांनी यामधून बोध घेणे गरजेचे आहे. दरम्यान, औंध भागातगेल्या दोन  वर्षांत सुमारे आठ ते दहा जणांचा बळी गेला असून अनेक जण जखमी झाले आहेत. त्यामुळे रस्त्यांचा दर्जा, सुरक्षितता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास कोणी कल्पना केली नव्हती त्या औंध ते खरशिंगे रस्त्यावर दोन दुचाकींची समोरासमोर  धनगर वस्तीजवळ धडक होऊन दोन युवकांचा जाग्यावर मूत्यू झाला. हा  अपघात एवढा भीषण होता की दोघांच्या डोक्याला जबर मार लागल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होऊन जाग्यावर मृत्यू झाला होता.

नियमित अनेक अपघात होत असतात पण ज्यावेळी आपल्या जवळची व्यक्ती जाते त्यावेळी सर्व कायदे, नियम, सुरक्षितता आठवते.सध्या पालक वर्गाकडून पाल्यांना दुचाकी घेऊन देण्याची क्रेझ समाजात दिसून येत असून तरूणाईमध्येही अगदी पाऊण लाखापासून दिड ते दोन लाखाच्या फॅशनेबल दुचाकी घेण्याची वाढती क्रेझ आहे. तशी गळ आईवडिलांना ते घालत असतात.दुचाकी म्हटले की, तरूणाई मध्ये सळसळता उत्साह, धूम स्टाईल वाहन चालविणे आलेच. पण, त्याचे वाहन चालविण्याचे वय आहे  का?     असेल तर लायसेन्स काढले का? हेल्मेट वापरतो का? याची शहानिशा करणे गरजेचे आहे. पण, सर्रास कायदा धाब्यावर बसवून अनेक ठिकाणी वाहनचालक वाहने चालवित असतात. मग अपघात झाला की तेवढ्यापुरते सर्व आठवते. 

औंध भागातील औंध ते नांदोशी, औंध ते जायगाव, चौकीचा आंबा, औंध ते कुरोली, औंध ते खरशिंगे या मार्गावर मागील काही वर्षांमध्ये आठ ते दहा जणांचे बळी गेले असून पस्तीस ते चाळीसजण जायबंदी झाले आहेत.

यामध्ये रस्त्यांची दुरवस्था, वाहनांचा वेग, मद्यपान, कामाची घाई गडबड या व अनेक बाबी अपघातास कारणीभूत ठरत आहेत. आपल्या मागे आपले कुटुंबीय आहेत, याची काळजी घेऊन वाहन चालविल्यास कायद्याचे पालन केल्यास, नियम पाळल्यास निश्‍चितच मोठ्या प्रमाणात अपघातांना प्रतिबंध बसेल. त्यासाठी सामाजिक जागृती गरजेची आहे. त्याचबरोबर अल्पवयीन मुलामुलींना सज्ञान होईपर्यंत वाहन चालविण्याची मुभा देऊ नये , असा मतप्रवाह समाजात उमटू लागला आहे.