Fri, Aug 23, 2019 23:19होमपेज › Satara › खंडणीसाठी बेकरीवर सशस्त्र हल्ला

खंडणीसाठी बेकरीवर सशस्त्र हल्ला

Published On: Apr 06 2018 1:29AM | Last Updated: Apr 05 2018 11:07PMसातारा : प्रतिनिधी

गोडोली येथील साई मंदिरासमोरील शगुन या बेकरीवर दोन युवकांनी तलवारीसारखी धारदार शस्त्रे नाचवत हल्ला केला. खंडणीसाठी बुधवारी रात्री ही घटना घडली. दरम्यान, हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून घटनेने परिसरातील व्यापारी, दुकानदार, नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

विकी अडसूळ व सोहेल ऊर्फ स्वप्निल शेख (दोघे रा. शाहूनगर) यांच्यावर सातारा शहर पोलिस ठाण्यात खंडणी मागून धारदार शस्त्र नाचवल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. अब्दुल अजीज छोटूभाई शेख (रा. गोडोली) यांनी याबाबतची तक्रार पोलिस ठाण्यात दिली आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, बुधवारी रात्री सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास शगुन या बेकरीमध्ये गिर्‍हाईकांची गर्दी होती. याचवेळी संशयित दोघे बेकरीच्या काऊंटरजवळ आले. त्यातील एका संशयिताकडे तलवारीसारखे धारदार शस्त्र होते. ‘मला दोन हजार रुपये द्या, नाहीतर दुकान आत्ताच्या आत्ता बंद करा.’  असे धमकावत काऊंटरवर शस्त्र मारले. या घटनेने दुकानामध्ये आलेल्या  ग्राहकांनी भितीने काढता पाय घेतला. 

सीसीटीव्हीमध्ये हा थरार कैद झाला आहे. धक्‍कादायक बाब म्हणजे या बेकरीपासून अवघ्या 100 मीटर अंतरावरच गोडोली चौकी आहे. पोलिस चौकीसमोरच हा प्रकार घडल्याने आश्‍चर्य व्यक्‍त होत आहे. दरम्यान, या घटनेनंतर तक्रारदार यांनी रात्री उशीरा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून पोलिस पुढील तपास करत आहेत.

टोळ्यांकडून गुन्ह्यांचे वाढते प्रमाण...

सातार्‍यात गेल्या दोन महिन्यांपूर्वीच गोल मारुती मंदिरासमोर स्वीट मार्टच्या दुकानावर अशाच पद्धतीने हल्‍ला झाल्याने खळबळ उडाली होती. संशयित आरोपींनी दुकानाच्या काचांची तोडफोड करून आतील साहित्य रस्त्यावर फेकले होते. ही घटना ताजी असतानाच बुधवारी रात्री अशाच प्रकारे गोडोली येथील घटना घडल्याने गुंडगिरी करण्यार्‍या टोळ्यांचे गुन्हे करण्याचे प्रकार वाढल्याचे समोर आले.

थेट तलवारीसारखी शस्त्रे नाचवली जात असल्याने अशा गुंडांचा पोलिसांनी बंदोबस्त करण्याची गरज निर्माण झाली आहे. दरम्यान, गोडोली येथे नुकतीच एका एसटीवर दगडफेकीची घटना घडली होती. यामुळे गोडोली पोलिस चौकीतील पोलिसांचे पोनि नारायण सारंगकर यांनी कान उपटणे गरजेचे बनले आहे.

 

Tags : satara, satara news, crime, ransom, bakery Armed attack,