Sun, Aug 25, 2019 12:40होमपेज › Satara › घरांच्या 190.20 कोटींच्या प्रस्तावाला मंजुरी : खा. उदयनराजे

घरांच्या 190.20 कोटींच्या प्रस्तावाला मंजुरी : खा. उदयनराजे

Published On: Jun 01 2018 2:14AM | Last Updated: Jun 01 2018 1:33AMसातारा : प्रतिनिधी

पंतप्रधान आवास योजनेअंतर्गंत नगरपरिषदेने सादर केलेल्या 1958  घरांच्या प्रस्तावास केंद्र शासनाची मंजुरी मिळाली असून, त्याकरीता 190 कोटी रुपयांचा निधी नगरपरिषदेला  मंजूर करण्यात आला. झोपडपट्टीसदृश वसाहतीमधील आणि ज्यांना स्वत:चे घर नाही, अशा प्रत्येक कुटुंबाला हक्काचे घर मिळवून देण्याच्या आपल्या प्रयत्नांना या मंजुरीमुळे अधिक बळ मिळाले असल्याची प्रतिक्रिया एका पत्रकाद्वारे खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी व्यक्त  केली आहे.

1958 घरांपैकी 1658 घरे ही परवडणारी घरे (अफोर्डेबल हौसिंग स्कीममधील, मागेल त्याला घर) असणार आहेत. त्यासाठी 151 कोटी 38 लाखांचा निधी  तर जुन्याच जागेवर असलेल्या झोपडपट्टी सदृष्य घरांच्या जागेवर नव्याने उभारण्यात येणा-या 300  घरांसाठी 38 कोटी 82 लाख असा एकूण 190 कोटी 20 लाखांच्या प्रस्तावाला  मिळालेल्या मंजुरीमुळे सातारच्या विकासात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रसिध्दीपत्रकात खा. उदयनराजे भोसले यांनी पुढे नमूद केले आहे की, नगरपरिषदेने पंतप्रधान आवास योजनेअंतर्गंत घरे बांधण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला होता. यामध्ये 300 घरे, सध्या आहेत त्याच झोपडयांच्या जागेवर बांधण्यात येणार असून 1658 घरे (परवडणारी घरे योजने) मधून निर्माण केली जाणार आहेत. या घरांचे वाटप निकषाप्रमाणे मागेल त्याला प्रदान करण्यात येणार आहे. पंतप्रधान आवास योजनेमधून बांधली जाणार्‍या एकूण 1958 घरांची पुढील 5 वर्षाच्या देखभालीची जबाबदारी घरे बांधणार्‍या ठेकेदाराकडूनच करुन घेतली जाणार आहे. या मंजूरीमुळे सातारा शहराची वाटचाल झोपडपट्टीमुक्त सातार्‍याच्या दिशेने झाली आहे.

पंतप्रधान आवास योजनेअंतर्गंत घरकुलांसाठी 190 कोटी 20 लाख रुपयांचा निधी मंजूर झाल्याने एकुण 1958 बेघर कुटुंबांना मुलभूत सुविधांसह स्वतःचे हक्काचे घर मिळणार असल्याने सर्वसामान्य व्यक्तींच्या दृष्टीने ही समाधानाची बाब आहे, असेही खा.उदयनराजे भोसले यांनी पत्रकात म्हटले आहे.