Sat, May 25, 2019 22:57होमपेज › Satara › कराडच्या प्रस्तावित कामांबाबत मुख्यमंत्र्यांकडे  निवेदन 

कराडच्या प्रस्तावित कामांबाबत मुख्यमंत्र्यांकडे  निवेदन 

Published On: Jun 07 2018 2:09AM | Last Updated: Jun 06 2018 11:37PMकराड : प्रतिनिधी 

विठ्ठल-रुक्मिणी मंदीर समितीचे अध्यक्ष राज्यमंत्री ना. अतुल भोसले व नगराध्यक्षा सौ. रोहिणी  शिंदे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबई येथे मंत्रालयात भेट घेऊन कराड शहराच्या विकासाच्या द‍ृष्टीने महत्त्वपूर्ण विषयांचे प्रस्ताव त्यांच्याकडे सादर केले.

प्रस्तावामध्ये नगरपरिषदेच्या छत्रपती शिवाजी स्टेडियम विस्तारासाठी 10 कोटी, अपारंपरिक सौर ऊर्जेअंतर्गत वीज निर्मिती करणेकामी 19 कोटी, पेठ शुक्रवार पेंढारकर पुतळ्यामागे पार्किंग विकसित करणे कामासाठी 2 कोटी, शनिवार पेठ कोयना दूध कॉलनीमधील जिव्हेश्‍वर मंदीर ते उत्तरेस मोरे घरापर्यंत पाटण कॉलनी परिसरात उड्डाण पूल बांधणे कामासाठी 2.50 कोटी, वाढीव भागातील वाकाण परिसरातील रस्त्यांसाठी 4.50 कोटी, शहरात समाविष्ट झालेल्या वाढीव हद्दीतील रस्त्यांसाठी 15 कोटी, श्री विठ्ठल मंदीर परिसर गुरुवारपेठ व मंडई परसिरातील सोमेश्‍वर मंदीर चौकातील आरक्षित जागेत पार्किंगची व्यवस्था करणे कामी 10 कोटी असे एकूण 63 कोटींचे प्रस्ताव मुख्यमंत्री यांच्याकडे सादर करण्यात आले. तसेच कोयना नदीवरील नगरपरिषदेच्या नवीन जॅकवेलनजीक अपूर्ण असणारे के.टी. वेअरचे काम लवकरात लवकर पूर्ण करणेकामी शासनस्तरावरून योग्य मदत मिळावी, अशी मागणीही नगराध्यक्षा यांनी यावेळी केली के.टी. वेअरचे काम पूर्ण झाल्यानंतर टेंभू धरणामध्ये साठणारे पाणी बॅकवॉटर पध्दतीने परत येणार नसून  त्यामुळे शहराला स्वच्छ व चांगल्या दर्जाच्या पाणीपुरवठा करणे शक्य होणार आहे असे नगराध्यक्षांनी मुख्यमंत्री यांच्याबरोबर झालेल्या चर्चेत सांगितले. यावेळी शहराच्या विविध विकासकामांबद्दल विस्तृत चर्चा झाली. 

भारतीय जनता पक्ष सत्तेत आल्यापासून कराड नगरपरिषदेला सुमारे 22 कोटींचा निधी मिळाला असून या निधीमधून शहरामध्ये विकासकामे सुरू आहेत. राज्याचे महसूलमंत्री ना.चंद्रकांत पाटील यांच्या विशेष सहकार्यामुळे व अतुल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली शहरामध्ये जास्तीत जास्त विकासकामे करणे व यासाठी  शासनाकडून  निधी उपलब्ध करून घेणे याकामी नगराध्यक्षा शिंदे, उपनगराध्यक्ष जयवंतराव पाटील, ज्येष्ठ  नगरसेवक विनायक पावसकर, यशवंत विकास आघाडीचे अध्यक्ष राजेंद्रसिंह यादव व सत्तारुढ आघाडीचे सर्वच नगरसेवक प्रयत्न करत आहेत. तसेच महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष ना. शेखर चरेगांवकर, भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांचीही साथ नगरपरिषदेस मिळत आहे. यामुळे या नगरीचा चौफेर विकास होण्यासाठी कसलीही अडचण येणार नाही, अशी माहिती  नगराध्यक्षा सौ. शिंदे यांनी यावेळी दिली. 

यावेळी अतुलबाबा युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष उमेश शिंदे, नगर अभियंता एम. एच.पाटील, अतुल भोसले  यांचे स्वीय सहायक फत्तेसिंह सरनोबत, नगराध्यक्षांचे खाजगी स्वीय सहायक प्रशांत चव्हाण उपस्थित होते.