Thu, Jul 18, 2019 14:49होमपेज › Satara › मुख्यमंत्र्यांची बदनामी खपवून घेणार नाही : आशा पंडित

मुख्यमंत्र्यांची बदनामी खपवून घेणार नाही : आशा पंडित

Published On: Feb 18 2018 2:03AM | Last Updated: Feb 17 2018 10:25PMसातारा : प्रतिनिधी

सातारा पालिकेचे मुख्याधिकारी शंकर गोरे यांना माहिती अधिकाराखाली माहिती मागवून नाहक त्रास दिला जात आहे.  सुशांत मोरे या माहिती अधिकार कार्यकर्त्याने शहरातील नागरिकांनाही सळो की पळो करुन सोडले आहे. मोरे यांची चौकशी करावी. मोरेंनी व्हॉट्सअ‍ॅपवर मुख्यमंत्र्यांची बदनामी केली आहे. यापुढे असा प्रकार घडल्यास बंदोबस्त करु, असा इशारा  भाजपच्या नगरसेविका सौ. आशा पंडित यांनी दिला.

जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, मातब्बरांची माहिती अधिकारात माहिती काढून तडजोडीने नाकीनऊ आणले आहे. लोकप्रतिनिधी, व्यापारी, उद्योगपती तसेच अधिकार्‍यांना वेठीस धरुन सुशांत मोरे हे दहशत माजवतात. त्यांनी आजपर्यंत केलेल्या बर्‍याच तक्रारींचे समधानकारक निकाल लागलेले नाहीत. सातारा शहरासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून कोट्यवधींचा निधी उपलब्ध झाला आहे.

मात्र, तरीही सुशांत मोरे यांच्याकडून मुख्यमंत्र्यांबद्दल आक्षेपार्ह  मजकूर व्हॉट्सअ‍ॅपवरुन प्रसारित केला जात आहे. सुशांत मोरेंनी समाजासाठी काय केले ते सांगावे. कुठल्या गरीबाला कधी मदत केली का? कधी कुठं साधं रोप लावलं का? यापुढे मुख्यमंत्र्यांचा अपमान केल्यास खपवून घेणार नाही. आमच्या स्टाईलने बंदोबस्त करु,  असा इशारा भाजपच्या नगरसेविका सौ. आशा पंडित यांनी दिला आहे. यावेळी कृष्णा खोरे विकास महामंडळाचे अधीक्षक अभियंता विजय घोगरे, भाजपचे नगरसेवक विजय काटवटे, माजी नगरसेवक किशोर पंडित आदि उपस्थित होते.