Sat, Sep 22, 2018 11:24



होमपेज › Satara › सातारा : गर्भपात औषध विक्रीप्रकरणात आणखी एकाला अटक   

सातारा : गर्भपात औषध विक्रीप्रकरणात आणखी एकाला अटक   

Published On: Apr 08 2018 3:34PM | Last Updated: Apr 08 2018 3:34PM



 सातारा : प्रतिनिधी 
अवैधरित्या गर्भपात औषधाचा साठा केल्याप्रकरणी आणखी एकाला अटक करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी सातारा जिल्ह्यात अवैधरित्या गर्भपात औषधांचा साठा केल्याचा प्रकार उघडकीस आला होता.  या प्रकरणात मोठी साखळी असल्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. गर्भपात औषधांचा साठा सापडल्यानंतर पुढील साखळी सापडत नसल्याचे वृत्त दै.‘पुढारी’ने प्रसिध्द करताच रविवारी या प्रकरणात विलास पांडूरंग देशमुख (वय 64 मूळ रा.मायणी ता.खटाव सध्या रा.मलकापूर ता.कराड) याला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने ठाणे येथून अटक केली. तो मुंबई, पुणे येथे औषध विक्रीचे काम करत असल्याचे समोर येत आहे. 

न्यायालयाने संशयित आरोपीला ११ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणातील ही दुसरी अटक असून आता अटक सत्र वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सातारा जिल्ह्यातील कोंडवे गावच्या हद्दीत १५ दिवसांपूर्वी गर्भपात औषधांचा साठा सापडल्यानंतर सातारा शहरासह जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली . सुरुवातीला गुन्हा दाखल करण्याच्या नाट्यावरुन चार दिवस हे प्रकरण अधांतरीच होते. अखेर तालुका पोलिस ठाण्यात याप्रकरणी विजय प्रकाश संकपाळ, अमिर महमूद खान (दोघे रा.हिरापूर, कोंडवे), प्रशांत नामदेव शिंदे (रा.अंबेदरे रोड) व विलास पांडूरंग देशमुख (रा.मलकापूर) यांच्यावर गुन्हा दाखल झाला. संशयितांवर सध्या भादवि कलम ३२८, ३३६, ३४ सह औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा कलम १८ (सी), १८ (ए), २७ (बी) (२) या अन्वये गुन्हा दाखल झालेला आहे. 
गुन्हा दाखल होण्यासाठी विलंब झाल्याचा फायदा उठवत या प्रकरणातील चौघांनी पळ काढला होता. त्यानंतर या प्रकरणाचा तपास एलसीबीकडे वर्ग करण्यात आला. एलसीबीकडे तपास येताच या विभागाने सातार्‍यातील बाळासाहेब देशमुख या मेडीकलमध्ये काम करणार्‍या कामगाराला अटक करुन पहिला दणका दिला. सध्या हा संशयित आरोपी जेलमध्ये आहे. एलसीबीच्या या कारवाईनंतर मात्र पुढे कारवाई सरकत नव्हती. यामुळे दै.‘पुढारी’ शनिवारीच या प्रकरणाचा तपास पुढे सरकत नसल्याचे वृत्त प्रसिध्द केले. या वृत्ताची गंभीर दखल घेत पोलिसांनी शोध मोहिम तीव्र केली असता अखेर विलास देशमुख या संशयिताला अंबरनाथ येथून ताब्यात घेण्यात आले.

पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार प्रसन्न जर्‍हाड, पोलिस हवालदार विजय कांबळे, शरद बेबले, मुबीन मुलाणी, विजय सावंत, गणेश कचरे यांनी कारवाईत सहभाग घेतला.

Tags : person, arrested,abortion drug sales,satara