Fri, Jul 19, 2019 23:11होमपेज › Satara › स्ट्रक्‍चरल ऑडिट यंत्रणेची घोषणा हवेतच

स्ट्रक्‍चरल ऑडिट यंत्रणेची घोषणा हवेतच

Published On: Aug 30 2018 1:32AM | Last Updated: Aug 29 2018 11:04PMसातारा : प्रतिनिधी

जिल्हा परिषदेच्या विविध विभागामार्फत गावोगावी विकास कामे केली जातात मात्र ही कामे दर्जेदार होताना दिसत नाहीत. त्यासाठी या कामाचे खासगी त्रयस्थ संस्थेमार्फत ऑडिट करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत पाच महिन्यांपूर्वी घेण्यात आला होता. मात्र स्ट्रक्‍चरल ऑडिट करण्याची वरिष्ठ आधिकार्‍यांनी केलेली घोषणा हवेतच विरली की काय? ‘सीईओ, तुमच्या घोषणेला पाच महिने उलटले की हो!’ असा पुकारा होऊ लागला आहे. 

केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून गावोगावी विकास कामासाठी कोट्यवधी रूपयांचा निधी येत असतो. त्यामुळे जिल्ह्यातील प्रत्येक गावात विविध कामे सुरू असतात. प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र इमारत, ग्रामपंचायत, अंगणवाडी, शाळा, समाजमंदिर इमारत , गटारे बांधकाम यासह विविध कामांसाठी कोट्यवधी रूपयांचा चुराडा होत असतो. 

बहुतांश ठिकाणी नव्याने बांधण्यात  आलेल्या इमारतीच्या बांधकाम व स्लॅबमधून  पाणी गळू लागले आहे. त्यामुळे कामे निकृष्ट दर्जाची झाली असल्याचे समोर आले आहे. अनेक कामात बांधकाम विभागाच्या नियमावलीनुसार कामे झालीच नाहीत. कामाची गुणनियंत्रण तपासणी केली गेली नसल्याने सर्वत्र  भोंगळ कारभार सुरू आहे. संबंधित गटातील सुरू असलेल्या कामाबद्दल सदस्यांनी संबंधित अधिकार्‍यांना सूचना दिल्या  तरी काहीही कार्यवाही होताना  दिसत नाही. त्यामुळे पदाधिकारी व अधिकारीही साधल्याचे सोबती असल्यासारखेच वावरत आहेत.

पदाधिकारीही अधिकार्‍यांच्या मदतीने आलेला पैसा कसा जिरवायचा  हा प्रयत्न करताना दिसत आहेत. आपल्या गटातील कार्यकर्त्यांला विविध विकास कामांचा ठेका देवून  रोजी रोटी चालवण्याचा उद्योग हे पदाधिकारी करत असतात. मात्र कार्यकर्तेही निकृष्ट दर्जाचे काम करून पदाधिकार्‍यांनी सोपवलेली जबाबदारी निष्ठेने पार पाडत असतात.

अनेक सदस्यांनीही जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत निकृष्ट बांधकामाबाबत पोटतिडकीने पाढाच वाचला मात्र पदाधिकारी व अधिकार्‍यांनी विचारलेल्या प्रश्‍नावर तेवढ्यापुरती मलमपट्टी करण्याचे आश्‍वासन सभागृहात दिल्यानंतर  सदस्यही गप्प होतात.

मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी  बांधकामांची गुणवत्ता तपासणीसाठी खासगी त्रयस्थ यंत्रणा नेमणार असल्याची ग्वाही सभागृहात सदस्यांना दिली होती. या त्रयस्थ यंत्रणेमार्फत बांधकामाची तपासणी करण्यात येणार आहे. असे आश्‍वासन दिल्यानंतर सदस्यही गप्प बसले मात्र सीईओंनी सभागृहात आश्‍वासन देवून सुमारे 5 महिन्याचा कालावधी उलटला तरी जिल्हा परिषद प्रशासनाने बांधकामाची गुणवत्ता तपासणीसाठी  खाजगी त्रयस्थ यंत्रणा काही उभारली गेली नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे सीईओंनी सभागृहात केलेली घोषणा हवेतच विरली की काय ? असा सवाल उपस्थित होत आहे.

सध्या जिल्ह्यातील विविध गावांमध्ये  सुरू असलेली कामे  क्वॉलिटीची होत आहेत का निकृष्ट दर्जाची होत आहेत? याची प्रशासनाने शहनिशा करणे गरजेचे आहे. निकृष्ट प्रतीची होत असलेल्या बांधकामावर प्रशासनाने लवकरच लगाम न घातल्यास काळ सोकावत राहणार आहे.तसेच विविध कामामध्येही अधिकारीही ठेकेदारांच्या मर्जीने कामे मॅनेज करून ते स्वत:च कामे करत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे हे अधिकारी कोण आहेत? याची प्रशासनाने खातरजमा करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणीही होत आहे.