Mon, Mar 25, 2019 04:58
    ब्रेकिंग    होमपेज › Satara › वीज मंडळाविरोधात अंगापूर परिसरात संताप 

वीज मंडळाविरोधात अंगापूर परिसरात संताप 

Published On: Jan 16 2018 2:17AM | Last Updated: Jan 15 2018 10:25PM

बुकमार्क करा
अंगापूर : वार्ताहर 

अंगापूर परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून वीज मंडळाच्या कारभाराचा खेळखंडोबा सुरू असून शेतकरी वर्ग त्रस्त झाला आहे. परिसरातील वर्णे, अंगापूर तर्फ, अंगापूर वंदन, धोंडेवाडी, निगडी, फडतरवाडी येथील शेतकरी वीज मंडळाच्या भोंगळ कारभारामुळे आंदोलनाच्या पवित्र्यात असून त्यांच्यामधील उद्रेक केव्हाही बाहेर पडण्याची चिन्हे आहेत. 

अंगापूर, वर्णे परिसरात  अनियमित वीज पुरवठा सुरू आहे. याबाबत अनेकदा शेतकर्‍यांनी तक्रारी करूनही त्याची दखल घेतली गेली नाही. त्यामुळे परिसरातील शेतकरी त्रस्त झाले आहेत. बर्‍याच वेळ वीज असते; परंतु डीपीतील फ्यूज केव्हा जाईल याचा नेम नसतो. मूळातच शेतातील डिपींना दरवाजे नाहीत, त्यामुळे सुरक्षितता वार्‍यावर आहे. त्यातच तो फ्यूज बसविण्यासाठी वीज कंपनीचा कर्मचारी वेळेवर येत नसल्याच्या शेतकर्‍यांच्या तक्रारी आहेत. नाईलाजास्तव शेतकर्‍यांना फ्यूज नसलेल्या डीपीत वायरचे तुकडे जोडून वीज चालू करावी लागत आहे. यामुळे शेतकर्‍यांना जीव  धोक्यात घालून रात्री-अपरात्री शेतीला  पाणी द्यावे लागत आहे. यापूर्वी अधिकार्‍यांना अनेक वेळा या तक्रारी फोनवरुन व समक्ष भेटून कानावर घालूनही परिस्थितीत कसलीच सुधारणा न झाल्यामुळे शेतकरी मात्र संतप्त झाले आहेत. यामुळे यात सुधारणा न झाल्यास परिसरातील शेतकरी आंदोलनाच्या मार्गावर आहेत. 

मंगळवारी दुरुस्तीचे कारण सांगून शेतीसह गावातील वीजही दिवसभर कोणतीही आगावू सूचना न देता बंद ठेवली जात आहे. बुधवारी सकाळी येणारी वीज सुरु होते. मात्र, त्यानंतर अधूनमधून बंद होते. नदीवरुन मोटार सुरु करुन शेतात येईपर्यंत वीज गायब होत असल्याचा अनुभव शेतकर्‍यांना वारंवार प्रत्ययास येत आहे. अतित तसेच सातारा येथील विभागीय कार्यालयाशी सपर्क साधला असता थातूरमातूर व उडवाउडवीची उत्तरे देऊन फोन बंद केला जात असल्याचे शेतकर्‍यांचे म्हणणे आहे. 

वीज बिले मात्र अंदाजे व भरमसाठ आकारली जात आहेत. या अशा वीजवितरण कंपनीच्या अनेक भोंगळ कारभाराला शेतकरी वैतागले आहेत. यामध्ये सुधारणा न झाल्यास शेतकरी तीव्र आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.