Sun, May 26, 2019 11:00होमपेज › Satara › अनैतिक संबंधाच्या संशयातून अमितचा खून

अनैतिक संबंधाच्या संशयातून अमितचा खून

Published On: Aug 06 2018 1:56AM | Last Updated: Aug 05 2018 11:03PMसातारा : प्रतिनिधी

बुधवारी भल्या पहाटे सातारा-लोणंद रस्त्यावर अमित भोसले (रा.अरबवाडी, ता. कोरेगाव) या युवकाचा अपघातात मृत्यू झाल्याच्या बनावाचा अखेर पर्दाफाश झाला असून त्याचा खून झाल्याचे उघडकीस आले आहे. पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या कारणावरून जीवलग मित्रानेच खून केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. योगेश बाळकृष्ण भिलारे, त्याची पत्नीसौ. अर्चना भिलारे व निखिल उद्धव भिलारे (तिघे रा.अरबवाडी)  अशी  अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. मृत अमितचे पदवीपर्यंत शिक्षण झाले असून ॉतो छत्रपती शिवाजी कॉलेजमधील स्पर्धा परिक्षा केंद्रात अभ्यास करत होता. खूनप्रकरणी त्याचा भाऊ रमेश सुभाष भोसले (वय 27, रा.अरबवाडी पो.बनवडी ता.कोरेगाव) याने सातारा तालुका पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, दि. 1 ऑगस्ट रोजी पहाटे अमित भोसले या युवकाचा सातारा- लोणंद रस्त्यावरील शिवथर येथे मृतदेह सापडला होता. प्रथमदर्शनी हा अपघातात असल्याचे भासवून त्याठिकाणी मृत युवकाची दुचाकीही आढळली होती. तालुका पोलिस ठाण्यात याबाबतची नोंद झाल्यानंतर पोनि प्रदीप जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार सुजीत भोसले, सुहास पवार, पी. डी. तालटे, एम. यू. पाटोळे, आर. एम. चव्हाण  यांनी तपासाला सुरुवात केली. त्यांना पहिला प्रश्‍न असा निर्माण झाला की अमित भोसले शिवथर रस्त्यावर भल्या पहाटे का व कशासाठी गेला होता? या प्रश्‍नाचे उत्तर मिळवताना पोलिसांना अडचणी येवू लागल्यानंतर त्यांनी मंगळवारी दिवसभराची घटना पाहिली व एकेक धक्‍कादायक माहिती समोर येत गेली.

सातारा तालुका पोलिसांना तपासामध्ये काही संशयास्पद बाबी समोर आल्याने त्यांनी तपासावर लक्ष केंद्रीत केले. गेले चार दिवस या घटनेचा तपास सुरु असताना त्यांनी मृत अमितचा भाऊ रमेश याच्याकडून प्राथमिक माहिती घेतली. या माहितीमध्ये योगेश हा अमितचा मित्र असून त्याला अमितवर पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. यातून दोघांमध्ये भांडणे झाली  असल्याचेही समोर आले. यामुळे सातारा तालुका पोलिसांनी योगेशवर लक्ष केंद्रीत केले.

मंगळवारी दिवसभर व बुधवारी सकाळी कॉलेजवरील सीसीटीव्ही फुटेज पाहिले असता मंगळवारच्या फुटेजमध्ये योगेश व त्याची पत्नी अर्चना भिलारे हे दोघे अमित भोसले याला दुचाकीवरुन घेवून जात असताना निदर्शनास आले. यामुळे तालुका पोलिसांनी दोघांकडे चौकशी केल्यानंतर त्या दोघांनी कट रचून खून केला असल्याची माहिती समोर आली. दरम्यान, आतापर्यंत पोलिसांनी तिघांकडे चौकशी केली आहे. शनिवारी दिवसभर काही जणांकडे चौकशी सुरु होती.