Wed, Mar 20, 2019 13:07होमपेज › Satara › राज्यातील धोकादायक घाट रस्त्यांची दुरुस्ती करा : खासदार उदयनराजे

राज्यातील धोकादायक घाट रस्त्यांची दुरुस्ती करा : खासदार उदयनराजे

Published On: Jul 31 2018 1:36AM | Last Updated: Jul 30 2018 10:29PMसातारा : प्रतिनिधी

सातारा जिल्ह्यातून कोकणला जोडणारे अंबेनळी आणि कुंभार्ली हे दोन घाट आहेत. पैकी अंबेनळी घाट हा ब्रिटिशांनी महाबळेश्‍वरला येणे जाणे सोयीचे व्हावे याकरीता तयार केला असून त्यानंतर सुमारे 150 वर्षात या घाटाची किरकोळ मलमपट्टी करण्याशिवाय सार्वजनिक बांधकाम विभागाने फारसे काहीही केलेले नाही. त्यामुळे या दोन्ही घाटांसह सर्वच घाटांची  पहाणी व धोकादायक ठिकाणे निश्‍चित करुन त्यांची डागडुजी करावी, अशी मागणी खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी एका पत्रकाद्वारे केली आहे.  दरम्यान, सार्वजनिक वाहतूक अधिक सुरक्षित होण्यासाठी शासनाने प्राधान्य देण्याची गरज आहे, आता आणखी अंत पाहू नये, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

अंबेनळी घाटात बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठामध्ये कार्यरत असणार्‍या कर्मचार्‍यांचा एकाच वेळी झालेला अंत निश्‍चितच दुर्दैवी आहे. या दुर्घटनेत बळी गेलेल्या व्यक्‍तींच्या कुटुंबीयांच्या दुःखात आपण व्यक्‍तीशः सहभागी आहोत.एखादा मोठा हादसा झाला की, कुंभकर्णी झोपेत असलेली संबंधीत यंत्रणा खडबडून कामाला लागते, हा जनतेचा आजपर्यंतचा सर्वसाधारण अनुभव  आहे. पावसाळा सुरु झाला की, घाटात दरडी कोसळण्याचे प्रमाण आजकाल खूप वाढले आहे.

यवतेश्‍वर घाटातसुध्दा रस्ता खचला गेला आहे.  खंबाटकी घाट ओलांडून पुण्याकडे जाताना लागणारे एस वळण अजूनही सरळ करण्याकरीता कागदी घोडेच नाचवले जात आहे. सावित्रा नदीचा पुल पडल्यावर इतर पुलांचे स्ट्रक्‍चरल ऑडिट केले गेले, त्यानंतर गेल्या वर्षभरात एकाही पुलाचे काम हाती घेण्यात आलेले नाही.  एखादा पूल पडल्यावरच  शासन यंत्रणा काम करणार  का? सातारा तालुक्यातील संगम माहुली पुल (ब्रिटीश कंपनीने दिलेली गॅरंटी संपलेला पूल) तसेच आरळे पुल याबाबत कोणती दक्षता घेण्यात आली आहे,  याची काहीही माहिती जनतेलाच नव्हे तर लेाकप्रतिनिधींना दिली गेलेली  नाही ही वस्तुस्थिती असल्याचे  खा. उदयनराजे यांनी पत्रकात स्पष्ट केले आहे. 

राष्ट्रीय महामार्गावरील सुरुर गाव ते पोलादपूर व्हाया वाई-पाचगणी-महाबळेश्‍वर-वाडा- या रस्त्याचे रुंदीकरण-विस्तारीकरण करण्याबाबत आपण  सुमारे एक वर्षापूर्वी सुचवलेले होते. या मार्गावर मोठी रहदारी असून, या मार्गाचे रुंदीकरण व मजबुतीकरण करण्याचे  काम  हाती घेतले  गेले असते तर कदाचित आंबेनळीची दुर्घटना टळली असती. तथापि सरकार व सुस्तावलेले प्रशासन हे हादरा बसल्याशिवाय हलत नाही. याबाबत पश्‍चिम महाराष्ट्र आणि कोकणला जोडणा-या वरंधा, आंबेनळी, कुंभार्ली, मलकापूर, अंबा, फोंडा आदी घाटांसह महाराष्ट्रातील सर्व घाटांचे मजबुतीकरण करून  संरक्षक कठडयांचे काम तातडीने करण्यात यावे, अशी मागणीही पत्रकात करण्यात आली आहे.