Sat, Jun 06, 2020 00:23होमपेज › Satara › अंबर दिवा लावून टोल चुकवेगिरी

अंबर दिवा लावून टोल चुकवेगिरी

Published On: Apr 09 2019 1:59AM | Last Updated: Apr 08 2019 8:33PM
तासवडे टोलनाका :  प्रविण माळी

रूग्णवाहिकेकडुन  महामार्गावरील टोलनाक्यावर दिल्या जाणार्‍या  सुविधेचा गैरफायदा घेतला जात असुन शासकीय वाहन नसताना खासगी चारचाकी वाहन  चालक अंबर दिवा गाडीत ठेवुन टोल चुकवेगिरी करत असल्याचे अनेकदा निदर्शनास आले आहे. त्यामुळे वाहनधारक व नागरिकांतून तीव्र संताप व्यक्‍त होत आहे. रूग्णवाहिका व चारचाकी वाहनचालकांकडुन शासकीय नियम पायदळी तुडवत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

रूग्णवाहिकेसाठी महामार्गावरील प्रत्येक टोलनाक्यावर दोन्ही बाजुकडील एक लेन नेहमी रिकामी ठेवली जाते, की जेणेकरुन महामार्गावरील  अपघातातील जखमींना वेळेवर रूग्णालयात पोचवता येईल यासाठी  सुविधा शासकीय तसेच खाजगी रूग्णवाहिकांना देण्यात येते. परंतु या सुविधेचा रूग्णवाहिका कडुन गैरवापर करण्यात येत असल्याचे अनेकदा दिसून येत आहे. काही वेळा  रूग्णवाहिकेमध्ये रूग्ण नसतानाही टोलनाक्यावर आल्यावर अचानक सायनर वाजवण्यात येतो. तर काही रूग्णवाहिका मधुन राजरोसपणे  प्रवाशी वाहतुक करण्यात येते. त्यावेळी सुध्दा टोलनाक्यावर सायनर वाजवीत त्यांना दिलेल्या सुविधेचा गैरफायदा घेतला जातो. तसेच खासगी चारचाकी वाहनचालकांकडुन टोल चुकवण्यासाठी अंबर दिव्याचा  मोठया प्रमाणात वापर करण्यात येत आहे. आज शहरातील प्रत्येक गिफ्टगॅलरीत अंबर दिवे खुलेआम विकले जात आहेत. 

हे अंबर दिवे चारचाकी वाहनामध्ये चालकाच्या सीट समोर टोल कर्मचा-यास  बाहेरून दिसेल अशा पध्दतीने लावण्यात येतो. ज्यावेळी हे वाहन टोलक्यावर येते त्यावेळी गाडीची काच खाली न घेताच उच्चपदस्थ आधिका-याच्या  अर्विभावात गाडी टोल लेन मध्ये उभी केली जाते. त्यावेळी  टोलकर्मचारी अंबर  दिवा दिसल्यामुळे  कोणता तरी मोठा अधिकारी असेल , वादावादीचा प्रसंग नको म्हणुन  टोलची मागणी  करत नाही. यामुळे  खुलेआम विकत मिळणारे अंबर दिव्याचा  टोलचुकवण्याठी , नो पार्किग , तसेच शासकीय कार्यालयात विना तपासणी प्रवेश यासाठी वापर केला जात आहे.
त्यामुळे शासकीय आरोग्य विभाग, आरटीओ आणि पोलीस विभाग यांच्याकडुन शासकीय नियम पायदळी तुडवणा-या रूग्णवाहिका व खाजगी चारचाकी वाहनावर अंबर दिवा लावणार्‍यावर कठोर कारवाई होणार का? असा प्रश्‍न सर्वसामान्यांतून विचारला जात आहे. 

अंबर दिव्यास मोह सुटेना...

महसुल विभाग, गृहविभाग तसेच इतर उच्चपदस्थ अधिकारी यांना अंबर  दिवा असणारे  शासकीय वाहन दिमतीला असते. परंतु अनेक अधिका-यांना या अंबर दिव्याचा मोह सुटतासुटत नाही. त्यामुळे हे अधिकारी नियम नसतानाही स्वत:च्या खासगी वाहनास अंबर दिवा लावुन त्याचा गैरवापर  करताना दिसून येत आहेत. 

खासगी वाहनांमध्ये अंबर दिवा दिसल्यास व खोटे ओळखपत्र वापरल्यास कसून तपासणी केली जाणार आहे. यासाठी शासकीय अधिकारी, पोलिस यंत्रणेने सहकार्य करावे - रमेश शर्मा, टोल व्यवस्थापक 

शासकीय नियमानुसार अंबर दिवा वाहनामध्ये ठेवता येत नाही. अंबर दिवा स्पष्टपणे सर्वांना दिसेल असा लावावा लागतो. अंबर दिवा वाहनामध्ये ठेवून त्याचा गैरवापर करणार्‍या वाहनधारकांवर कारवाई करणार आहे.  - अजित शिंदे,उपप्रादेशिक वाहन अधिकारी