Thu, Jun 27, 2019 15:43होमपेज › Satara › दिव्यांग शाळा संघटनेचे दि.२४ पासून आमरण उपोषण 

दिव्यांग शाळा अनुदानाचे भिजत घोंगडे 

Published On: May 22 2018 1:29AM | Last Updated: May 21 2018 10:00PMरेठरे बु : प्रतिनिधी 

शासन तपासणी निकषाप्रमाणे पात्र असलेल्या 164 शाळांचा कायम विना अनुदान हा शब्द काढून 100 टक्के अनुदान मंजूर करण्यात यावे, तसेच शासनाने वेळोवेळी दिलेल्या आश्‍वासनांची पूर्तता करावी, यासह अन्य मागण्यांसाठी दिव्यांग शाळा संघटनेच्या वतीने मुंबई येथे आझाद मैदानावर दि. 24 मे रोजी बेमुदत आमरण उपोषण करण्यात येणार आहे, अशी माहिती संघटनेचे राज्य अध्यक्ष सदाशिव कांबळे यांनी दिली आहे.

गेली 15 वर्षापासून स्वयंसेवी संस्थांच्या वतीने कायम विना अनुदान तत्वावर संपुर्ण राज्यात दिव्यांग निवासी शाळा सुरू आहेत. शासनाने सर्वसाधारण शाळांना कायम शब्द काढून अनुदान तत्वावर त्यांना कायम मान्यता देवू केली आहे. परंतु दिव्यांग बाबत शासनाने कोणताही निर्णय न घेता नुसते आश्‍वासने देत आहे. कायम विना अनुदानीत शब्द काढल्यास अनुदान देण्याचा मार्ग मोकळा होईल. त्यासाठी शासनाने कायम शब्द काढावा व या शाळा व कर्मचार्‍यांना न्याय द्यावा अशी भुमिका राज्यातील शाळा चालक व कर्मचार्‍यांनी घेतली आहे.

राज्यात अपंग, अस्थीव्यंग, मुकबधीर व मतीमंद अशा दिव्यांगांच्या 843 शाळा व 25827 मुले शिक्षण घेत असून साधारण 900 ते 1000 कर्मचारी कार्यरत आहेत. शासनाच्या कोणत्याही अनुदानाशिवाय या शाळा  सुरू आहेत. संस्थाचालक 15 वर्षापासून पदरमोड करून शाळा चालवत आहेत. शिवाय कर्मचार्‍यांना ना पगार ना वेतन, अशी त्यांची अवस्था असून शासनाने याचा गांभिर्याने विचार करणे गरजेचे आहे.

15 एप्रिल 2015 रोजी शासनाने जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील सर्व दिव्यांग शाळांचा सर्व्हे केला होता. त्यात 164 शाळा  योग्य पध्दतीने कार्यरत असल्याचा अहवाल प्राप्त झाला होता. त्यानुसार त्यांना अनुदान मिळणे गरजेचे आहे.त्यासाठी सध्या असलेला कायम विना अनुदानातून या शाळा वगळणे गरजेचे ओह. नागपूर अधिवेशनात दिव्यांग शाळांचा प्रश्‍न सोडविणार अशी आश्‍वासने देण्यात आली होती. परंतु या शाळांबाबत योग्य भूमिका शासन घेताना दिसत नाही. या विरोधात दि. 24 मे पासून बेमुदत आमरण उपोषण करण्यात येत आहे. मुंबई येथे  संस्था चालक व शिक्षकांनी उपस्थित राहून आंदोलनास पाठिंबा द्यावा, असे आवाहन लक्ष्मण माने व राजेश उके यांनी केले आततहे.