Fri, May 29, 2020 18:09होमपेज › Satara › फलटणमध्ये युतीतच ‘फाईट’

फलटणमध्ये युतीतच ‘फाईट’

Published On: Sep 22 2019 1:35AM | Last Updated: Sep 21 2019 8:57PM
यशवंत खलाटे

फलटण विधानसभा मतदारसंघात अद्याप युती व आघाडीने कोणतीही भूमिका जाहीर केलेली नाही. आघाडी झाली असली तरी राष्ट्रवादीकडून कोण उमेदवार? याचे उत्तर मिळालेले नाही. तर भाजप व शिवसेनेच्या युतीला मुहूर्तच मिळाला नसलयाने फलटणमध्ये युतीकडून कोण? हा प्रश्न निरूत्तरच आहे. याशिवाय विधान परिषद सभापती ना. रामराजे ना. निंबाळकर यांनी वेट अँड वॉचची भूमिका घेतली आहे. 

फलटण विधानसभा मतदारसंघ हा राखीव असून, या ठिकाणी सध्याच्या घडीला राष्ट्रवादीचे विद्यमान आ. दीपक चव्हाण, खा. रणजितसिंह ना. निंबाळकर यांचे कट्टर दिगंबर आगवणे व महाबळेश्वरच्या नगराध्यक्षा सौ. स्वप्नाली शिंदे हे या मतदार संघासाठी इच्छुक उमेदवार आहे. युती झालीच, तर ना. रामराजे हे आपल्या गटासह शिवसेनेत जाण्याची शक्यता आहे. हा मतदारसंघ शिवसेनेला जातो, परंतु भाजपचे खासदार असल्याने युतीच्या उमेदवारांमध्येच लढाई होण्याचा अंदाज आहे. तर राष्ट्रवादीला उमेदवार शोधण्याची वेळ येऊ शकते.

शिवसेनेकडून माजी आमदार बाबुराव माने, माजी केंद्रीय राज्यमंत्री आनंदराव अडसूळ यांचे सुपुत्र माजी आमदार अभिजित अडसूळ हे सुद्धा मतदार संघात इच्छुक आहे.  मात्र, रामराजे शिवसेनेत गेले तर ते सांगतील तो उमेदवार निश्चित होईल. राष्ट्रवादी व काँग्रेसची आघाडी झाली आहे. 

फलटण मतदार संघात दीपक चव्हाण, स्वप्नाली शिंदे व दिगंबर आगवणे यांच्यातच उमेदवारीसाठी स्पर्धा आहे. वंचित बहुजन आघाडीतर्फे कोण? हे अजूनही गुलदस्त्यात आहे. वंचितच उमेदवार कोणाला तारक व कोणाला मारक ठरणार, हे निकालानंतरच समजणार आहे. त्यातच बंडखोरी आणि अपक्षांची संख्याही कमी नाही. त्यामुळे फलटण विधानसभा मतदार संघात पंचरंगी लढत होण्याची चिन्हे आहेत. 

गत विधानसभेच्या तुलनेत यंदाच्या लोकसभेला भाजपने राष्ट्रवादीची तब्बल 35 हजार मते आपल्याकडे खेचली आहे. त्यामुळे या मतदार संघात भाकरी फिरणार का, असा सवाल आहे. दीपक चव्हाण व दिगंबर आगवणे यांच्यातच प्रमुख लढत होण्याची चिन्हे आहे. गत निवडणुकीत चव्हाण यांना सुमारे 93 हजार, तर आगवणे यांनी 60 हजारांच्?या आसपास मते घेतली होती. परंतु, गत निवडणुकीचे चित्र यंदा पूर्णपणे पालटले आहे. या मतदार संघात भाजपची ताकद  थोडीशी वाढली आहे. लोकसभेला भाजपचे उमेदवार असलेल्या रणजित निंबाळकर यांना एक हजाराचे मताधिक्य आहे. रामराजेंच्या भूमिकेवर या मतदार संघात बरेच काही अवलंबून राहील. सौ. स्वप्नाली शिंदे यांच्या रूपाने एकच महिला चेहरा असून, त्या होम टू होम भेटी देत आहे. मात्र, त्यांना भाजपकडून उमेदवारी मिळणार का, असाही प्रश्न आहे.

शिवसेना व भाजपमध्ये युती होणार, हे जवळजवळ निश्चित असल्याचे बोलले जात आहे. फलटणमध्ये खासदार भाजपचा असल्याने मतदारसंघ किंवा उमेदवारांची अदलाबदली होऊ शकते. युतीच्या मित्रपक्ष यांनी हा मतदारसंघ मागितला तर मात्र हा रासपाला सुटू शकतो. मात्र, त्यांचा उमेदवार सौ. शिंदे किंवा आगवणे यांच्यापैकी एक असेल. दरम्यान, न्यू फलटण शुगरने शेतकर्‍यांची देणी थकवली आहेत. याबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत जो न्यू फलटणचा प्रश्न सोडवेल, त्याच्या पाठीशी राहण्याची भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेने घेतली आहे.