Wed, Apr 24, 2019 21:32होमपेज › Satara › कोयनेतील स्थिती; अनेक अनुत्तरीत प्रश्‍न आजही कायम

स्फोटानंतरही ‘ऑल इज वेल’

Published On: Dec 25 2017 1:18AM | Last Updated: Dec 24 2017 10:26PM

बुकमार्क करा

पाटण : प्रतिनिधी

कोयना धरणाच्या पायथा वीज गृहातील 220 केव्ही स्वीच यार्डजवळील स्फोटानंतरही सर्व काही ‘ऑल इज वेल’ असल्याचा साक्षात्कार वीज कंपनीस झाला आहे. सुदैवाने यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही. मात्र भविष्यात असा प्रकार पुन्हा होऊन एखादी दुर्दैवी घटना घडल्यास त्यास जबाबदार कोण? असा प्रश्‍न यानिमित्ताने समोर आला आहे. 

कोयना धरणाच्या उजवा पायथा वीज गृहातील 220 केव्ही स्वीच यार्डजवळ अचानक विद्युत दाब वाढल्यामुळे मोठा स्फोट झाला होता. यामुळे चाळकेवाडी, पोफळी, सातारा व अन्य ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला होता. तर वीज संच जळून मोठी हानी झाली होती. कर्मचार्‍यांच्या गलथानपणामुळे  हा प्रकार घडल्याचे बोलले जात आहे. मात्र असे असूनही या प्रकारावर पडदा टाकल्याचेच चित्र निर्माण झाले आहे.

स्वीच यार्डमध्ये विजेचा लोड किती येतो? यासाठी पायथा वीज गृहात महानिर्मिती कंपनीने कंट्रोल रूम यंत्रणा कार्यान्वित केली आहे. या रूममध्ये विजेचा लोड किती आला आहे, हे समजण्यास मदत होेते. कोयना पायथा वीज गृहात या रूममधील यंत्रणाच सतर्क नसल्यामुळे हा अपघात झाल्याची शक्यता आहे. पायथा वीज गृहात ज्यावेळी अपघात झाला, त्यावेळी महानिर्मितीचे व पायथा वीजगृहाचे जबाबदार अधिकारीही उपस्थित नव्हते, असेही बोलले जात आहे. त्यामुळेच भविष्यात अशी घटना पुन्हा घडल्यास त्यास जबाबदार कोण? यासह अन्य काही अनुत्तरीत प्रश्‍न निर्माण झाले आहेत.