Tue, Jun 02, 2020 00:11
    ब्रेकिंग    होमपेज › Satara › इस्लामपुरातील चौघांचे भुईंजमध्ये वास्तव्य

इस्लामपुरातील चौघांचे भुईंजमध्ये वास्तव्य

Last Updated: Mar 29 2020 10:47PM
भुईंज : पुढारी वृत्तसेवा

सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथे एकाच कुटुंबातील तब्बल 25 जण कोरोनाबाधित झाले आहेत. त्यामुळे इस्लामपूर सध्या चर्चेत आहे. याच इस्लामपूरमधील चौघे हे काही दिवसांपूर्वी भुईंजमधील एका व्यापार्‍याच्या घरी काही दिवस राहिले होते, अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे भुईंजसह परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

कोरोना व्हायरसने सर्वत्र हाहाकार माजवला आहे. देशात कोरोनाग्रस्तांची संख्या हजाराहून अधिक तर महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 200 जवळ आला आहे. सातार्‍यातही दोघे बाधित असले तरी त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. गेल्या काही दिवसांमध्ये इस्लामपूर येथे सौदी अरेबिया येथून आलेल्या एका कुटुंबातील 25 जणांना लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे सर्वत्र घबराटीचे वातावरण पसरले आहे. अशातच भुईंजमधील एका व्यापार्‍याकडे इस्लामपूरमधील चौघे काही जण वास्तव्यास असल्याची माहिती समोर आली. त्यामुळे संबधित शेजारील नागरिकांनी तत्काळ पोलिस व आरोग्य यंत्रणेला याची कल्पना दिली. याप्रकारामुळे भुईंजमध्ये काही काळ तणाव व भीतीचे वातावरण पसरले होते. यावेळी सपोनि श्याम बुवा, तहसिलदार रणजित भोसले, गटविकास अधिकारी उदयकुमार कुसूरकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदीप यादव यांनी नागरिकांची समजूत घातली. यावेळी संबधितांना होम क्‍वारंटाईन होण्याच्या सूचना दिल्या. 

त्याचबरोबर त्यांच्या शरीराचे तापमान पाहिल्यानंतर त्यांना कोरोनाचा संसर्ग झाले नसल्याचे अधिकार्‍यांनी सांगितल्यावर नागरिकांनी सुटकेचा निश्‍वास टाकला. दरम्यान, ही घटना उघडकीस आल्याने भुईंजमधील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीने गावातील प्रत्येक घराचा सर्व्हे करावा. त्यामध्ये कोणी आजारी आहेत का? कोणाच्या घरात परजिल्हा किंवा परदेशातून आलेले वास्तव्य करत आहेत का याची तपासणी करावी. जर कोणी वास्तव्यास असेल तर याची माहिती आरोग्य विभागाला द्यावी अशी मागणी नागरिकांनी यावेळी केली.