Mon, May 20, 2019 10:04होमपेज › Satara › अक्षय जाधव याचा खून की आत्महत्या?

अक्षय जाधव याचा खून की आत्महत्या?

Published On: Feb 25 2018 1:13AM | Last Updated: Feb 24 2018 9:53PMपाटण : प्रतिनिधी

बीबी (ता. पाटण) येथील अक्षय जाधव याच्या खूनाचा तपास लावण्यात अद्यापही पोलिसांना यश आले नाही. या गुन्ह्यात वैद्यकीय अहवाल व गुन्ह्याची अधिकृत नोंद ही गळा दाबून खून अशी केली असून अक्षयचे कुटुंबीय व ग्रामस्थ यावर ठाम आहेत. मात्र, तपासा दरम्यान ही आत्महत्या असल्याचेही पुढे येत असल्याच्या चर्चा आहेत. संशयित प्रेयसीची पोलिस कोठडीतून न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली. मात्र, अद्यापही ठोस निर्णय न झाल्याने हा खून की आत्महत्या याबाबतचे गुढ वाढतच चालले आहे. तपासात राजकीय दबाव असल्याचा आरोप झाल्याने पोलिसांची नक्की भूमिका काय यावरही प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. 

बीबी येथील अक्षय जाधव याचा व्हॅलेंटाइन दिवशी येराड येथे प्रेमप्रकरणातून खून झाला. याबाबत त्याचा शवविच्छेदन अहवालही गळा दाबून खून असाच आहे. तर पोलिस दप्तरीही तशीच नोंद असून येथे संशयितांविरूध्द खुनाचीच कलमे लावलेली आहेत. खून झाल्यापासून अक्षयचे नातेवाईक व बीबी ग्रामस्थांनी पोलिसांच्या भूमिकेबाबत संशय व्यक्‍त केला आहे. सुरूवातीलाच जोपर्यंत संबंधित प्रेयसी व तिच्या आईला अटक होत नाही तोपर्यंत हा मृतदेह ताब्यात घेणार नाही.

वेळप्रसंगी संशयितांच्या दारातच अक्षयवर अंत्यसंस्कार करू अशी भूमिका यांनी घेतली. याबाबत पोलिस अधिकारी व ग्रामस्थांमध्ये वादही झाला. त्यानंतर मग ती प्रेयसी, तिची आई व मामांना पोलिसांनी ताब्यात घेतले आणि मग अक्षयवर अंत्यसंस्कार झाले. त्यानंतर तपासाची माहिती घेण्याकरिता आलेल्या याच मंडळीची पोलिसांशी वादावादी झाली. तर त्यानंतर प्रेयसी वगळता इतरांना जबाब घेऊन सोडून देण्यात आले. तर प्रेयसीला अटक करून न्यायालयात नेले. दरम्यान याबाबत संबंधितांनी या तपासात पोलिस राजकीय दबावापोटी जाणीवपूर्वक हलगर्जीपणा करत असून याचा संशयास्पद तपास करणार्‍या पोलिस निरीक्षक आण्णासाहेब मांजरे यांचेकडून हा तपास काढून तो सीआयडीकडे देण्यात यावा, अशी मागणी संबंधितांकडे केली आहे. 

दोन्ही बाजूंनी तपास चालू आहे : पो. नि. मांजरे

या प्रकरणाचा आधी खून व त्यानंतर आत्महत्या या दोन्ही बाजूंनी तपास चालू आहे. अद्याप आम्ही कोणत्याही अंतिम निर्णयापर्यन्त आलेलो नाही. तपास हा योग्य रीतीने सुरू असून यात कोणावरही अन्याय होणार नाही आणि दोषींवर कारवाई नक्की होईल ,अशी माहिती पोलिस निरीक्षक आण्णासाहेब मांजरे यांनी दिली.