Wed, Jul 17, 2019 20:36होमपेज › Satara › अजित पवारांकडून कामकाजाचा आढावा

अजित पवारांकडून कामकाजाचा आढावा

Published On: Jan 07 2018 2:03AM | Last Updated: Jan 06 2018 8:50PM

बुकमार्क करा
सातारा : प्रतिनिधी

सातार्‍याच्या दौर्‍यावर आलेल्या माजी उपमुख्यमंत्री आ. अजित पवार यांनी पक्षाच्या कामकाजाचा आढावा घेतला. आ. अजित पवार शुक्रवारी कार्यक्रमानिमित्त सातारा दौर्‍यावर आले होते. यावेळी त्यांनी सायंकाळी शासकीय विश्रामगृह येथे कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी आ. शशिकांत शिंदे, जिल्हा परिषद अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, जिल्हाध्यक्ष सुनील माने, बाळासाहेब सोळस्कर व अन्य पदाधिकारी उपस्थित होते. शासकीय विश्रामगृहात आल्यानंतर कार्यकर्त्यांनी गर्दी दिली. यावेळी बारामतीहून आलेल्या कार्यकर्त्यांना जरी तुम्ही मला निवडून दिले असले तरी सातार्‍यातही कार्यकर्त्यांच्या समस्या सोडवाव्या लागतात. आपण 7 तारखेला भेटू असे म्हणत वाटेला लावले. 

सज्जनगड येथील रामदास स्वामी संस्थानचे विश्‍वस्त सु.ग. उर्फ बाळासाहेब स्वामी यांना पाणी पुरवठा योजनेबाबत माहिती विचारली. यावर बाळासाहेब स्वामी यांनी माहिती सांगितली. गडावर पर्यटकांचा मोठ्या प्रमाणात ओघ वाढल्यास निर्माण होणार्‍या कचर्‍याबाबत काय नियोजन केले? असे विचारले असता स्वच्छतेसाठी 4 कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आल्याचे सांगितले. 

त्यानंतर शुक्रवारी झालेल्या डीपीसीचा आढावा त्यांनी घेतली. सर्व पदाधिकार्‍यांना डीपीसी कशी झाली? असे विचारल्यांनतर संजीवराजे यांनी आ. शिंदे व डॉ. येळगावकर यांचे जरा वाजले असे सांगितले. यावर आ. पवारांनी डॉ. येळगावकर हे शासकीय निमंत्रित सदस्य आहेत. त्यांनी फक्त जिल्ह्यापुरतेच बोलायला हवे होते. डीपीसी सोडून राजकीय विषयाला त्यांनी  हात  कशाला घालायचा. डीपीसीतून काहीच कामे होत नसल्याचे आ. शिंदे यांनी त्यांना सांगितले. 

त्यावर अजित पवार यांनी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देत माझ्याकडे उर्जा खाते असताना मागेल त्याला वीज कनेक्शन देण्यात येत होते. कामांसाठी निधी पडू दिला नाही. मात्र, आताचे उर्जामंत्री थकीत बील भरल्याशिवाय वीज कनेक्शन देणार नसल्याचे सांगतात. पश्‍चिम महाराष्ट्रात जास्त कनेक्शन दिली आहेत आता विदर्भात दिली पाहिजे, अशी भूमिका घेतली. परंतु, विदर्भात 10 हजार कनेक्शन देत असाल तर प. महाराष्ट्रात किमान 2 हजार तरी कनेक्शन द्यावे असे सांगितले. 

दरम्यान, आ. अजित पवार शासकीय विश्रामगृहात आल्यानंतर त्यांचे लक्ष दिनदर्शिकेवर गेले. जुन्याच वर्षाची दिनदर्शिका असल्याने ते चांगलेच संतापले. त्यानंतर त्यांनी कर्मचार्‍यांना दिनदर्शिका बदलण्याचे आदेश दिले. त्यावर पक्षाची दिनदर्शिका न लावता शासकीयच दिनदर्शिका लावा,  असे सांगत कर्मचार्‍यांची झाडाझडती घेतली.

भांडू नका चांगले काम करा 

महिला आघाडीच्यावतीने काढण्यात आलेल्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. त्यावेळी महिला आघाडीच्या पदाधिकार्‍यांना चांगले काम करा, भांडू नका असा सल्लाही अजितदादांनी दिला.