Thu, Jul 18, 2019 00:03होमपेज › Satara › राष्ट्रवादीच्या रथात अनेक महारथी

राष्ट्रवादीच्या रथात अनेक महारथी

Published On: Jan 19 2018 2:00AM | Last Updated: Jan 18 2018 9:01PMपाटण : गणेशचंद्र पिसाळ

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आ. अजितदादा पवार यांच्या चाफळ दौर्‍यानंतर पाटण विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या गोटात गेल्या काही दिवसांपासून चांगलेच चैतन्य निर्माण झाले आहे. राष्ट्रवादीच्या एकाच रथात अनेक महारथी एकत्रित आल्याने या रथाची चाके मधल्या काळात कोणी पंक्चर केली नाहीत तर येणार्‍या विधानसभा निवडणुकीत हा रथ रोखणे भल्याभल्यांना कठीण असल्याचे मत जाणकार मंडळीतून व्यक्त केले जात आहे. 

पाटण विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसची तुल्यबळ ताकत आहे. मात्र पक्षांतर्गत बंडाळी व बुद्धिभेदाच्या राजकारणात नेमक्या वेळी समज गैरसमज अथवा मान सन्मानातून याच ताकतीला सुरूंग लागतो. आणि मग ’ तुला ना मला , दे दुसर्‍याला ’ याचे प्रत्यंतर अगदी गावागावातील वार्ड,  पंचायत समिती, जिल्हा परिषद ते अगदी विधानसभा व विधानपरिषद निवडणूकातही अनुभवायला मिळाले आहे. तर हिच मंडळी एकत्र आली की मग कोणाच्याही कुबड्यांशिवाय एकहाती निर्विवाद सत्ताही मिळवतात हेही यांनीच दाखवून दिले आहे. मध्यंतरी राज्यात व देशात हातातून सत्ता गेल्यानंतर मग काय होते याचा अनुभव आता राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांपासून ते अगदी तालुकास्तरीय नेते व पदाधिकार्‍यांनीही घेतला आहे. 

नक्कीच सत्तेविना शहाणपण आल्यानेच कदाचित आता पुन्हा एकाच रथात अनेक महारथी परत एकत्रित येऊ लागले आहेत. तर अगदी नेते असणार्‍या आ. अजितदादा पवार यांचाही संयम कमालीचा वाढल्याचेही यातून स्पष्ट झाले आहे. त्यामुळेच मग या दादांच्यासह एकाच रथातील विधानपरिषदेचे आ. नरेंद्र पाटील,युवा नेते सत्यजितसिंह पाटणकर, पक्षाचे माहिती व तंत्रज्ञान विभागाचे अध्यक्ष सारंग पाटील या महारथींचा रथ हा या मतदारसंघासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाही फार पुढे नेऊ शकतो असा विश्‍वासही अनेकांना वाटतो. 

निश्‍चितच मधल्या काळात याच रथातील मान्यवर महारथींच्या प्रवासाची दिशा एकच असली तरी तात्पुरते वेगळे मार्ग स्वीकारल्याने मग याच महारथींचा रथ अपेक्षित व नियोजित ठिकाणी पोहोचला नाही. दिशा नसेल तर कशी दशा होते याची अनुभूती आल्यानंतर या सगळ्यांनाच यापूढे एक मार्ग, एक दिशा आणि एकच ध्येय ठेवणे हे स्वतः व पक्षासाठीही हिताचे ठरेल.

मात्र यापैकीच कोणी मधूनच रथाची चाके पंक्चर करण्याचा किंवा हवा सोडण्याचा प्रयत्न केला तर मात्र पुन्हा बुडत्याचा पाय खोलातच याप्रमाणे पक्ष व या महारथींचीही अवस्था होईल. तर एकमेकांना पंक्चर करण्याच्या नादात स्वतःच्या चाकातील हवाच नव्हे तर स्टेरिंग कधी कोणी पळवून नेले हे समजणारही नाही. आणि मग पक्षाचीही अवस्था किमान या मतदारसंघात तरी ‘एक गाडी,  सब अनाडी ’ ! अशी होवू नये याची खबरदारी सर्वांनाच घ्यावी लागणार हे नक्की.