Wed, Nov 21, 2018 01:11



होमपेज › Satara › किल्‍ले अजिंक्यताराची वाट होणार सुकर

किल्‍ले अजिंक्यताराची वाट होणार सुकर

Published On: Feb 09 2018 2:02AM | Last Updated: Feb 08 2018 9:55PM



सातारा : प्रतिनिधी

अजिंक्यतारा किल्ल्यावर जाणार्‍या रस्त्याच्या दुरूस्तीसाठी तसेच पथदिवे बसवण्यासाठी आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी डीपीडीसीत जोरदार मागणी केली होती. त्यानुसार पथदिव्यांच्या कामास मंजुरी मिळून कामही सुरु करण्यात आले आहे. दरम्यान, नागपूर अधिवेशनातही आ. शिवेंद्रराजे यांनी रस्त्याचा प्रश्‍न उपस्थित करुन यासाठी पाठपुरावा केला आणि अजिंक्यतारा किल्यावर जाणार्‍या रस्त्यासाठी 1 कोटी 46 लाख 53 हजार रुपये निधीस प्रशासकीय मंजूरी मिळाली. इतिहासप्रेमी संघटना व नागरिकांनी आ. शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडे अजिंक्यतारा रस्त्याची दुरुस्ती आणि सुरक्षिततेच्यादृष्टीने पथदिवे बसवण्याची मागणी केली होती. आ. शिवेंद्रराजे यांनी गोडोली, किल्ला प्रवेश कमानीपासून अजिंक्यतारावर जाणार्‍या रस्त्याची दुरुस्ती आणि पथदिवे बसवण्याबाबत जिल्हा नियोजन विकास आराखडा बैठकीत आवाज उठवून हे दोन्ही प्रश्‍न मार्गी लावण्याची आग्रही मागणी केली होती.त्यांनी पालकमंत्री ना. विजय शिवतारे, जिल्हाधिकारी यांच्याकडेही सातत्याने पाठपुरावा केला होता. 

आ. शिवेंद्रराजे यांच्या पाठपुराव्यामुळे जिल्हा नियोजन समितीतून पथदिव्यांसाठी तातडीने निधी मंजूर करण्यात आला होता. पथदिवे बसवण्याचे कामही जोमाने सुरु आहे. किल्ल्यावर जाणार्‍या रस्त्याचा प्रश्‍न प्रलंबित होता.  जिल्हाधिकारी, पालकमंत्री यांच्याकडे पाठपुरावा केल्यानंतर आ. शिवेंद्रराजे यांनी नागपूर अधिवेशनात सदर रस्त्याचा प्रश्‍न उपस्थित केला. यावरच न थांबता त्यांनी पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या सचिवांची भेट घेऊन या रस्त्यासाठी तातडीने निधी मंजूर करण्याची मागणी केली होती. आ. शिवेंद्रराजे यांच्या विशेष प्रयत्न आणि पाठपुराव्यामुळे गोडोली, अजिंक्यतारा प्रवेश कमान ते अजिंक्यतारा किल्ल्यावरील प्रवेशद्वारापर्यंतच्या रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामासाठी पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाकडून प्रादेशिक पर्यटन विकास योजनेंतर्गत तब्बल 1 कोटी 46 लाख 53 हजार रुपयांच्या निधीला प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे.

या निधीमधून किल्ल्यावर जाणार्‍या  रस्त्याची दुरुस्ती करणे आणि रस्त्याच्या कडेला संरक्षक भिंत बांधणे हे काम केले जाणार आहे. यासंदर्भात दोन दिवसांपूर्वीच शासन निर्णय झाला असून सदर कामास निधी उपलब्ध करुन देण्याच्या सुचना जिल्हाधिकार्‍यांना मिळाल्या होत्या. त्यामुळे अजिंक्यतारा किल्ल्यावर जाणार्‍या रस्त्याची दुरावस्था काही दिवसांतवच दूर होणार असून हा रस्ता मजबूत आणि सुरक्षित होणार आहे. सदर कामाची तातडीने निविदा प्रक्रिया पूर्ण करुन त्वरित कामास सुरुवात करावी आणि काम दर्जेदार करावे, अशा सुचना आ. शिवेंद्रराजे यांनी संबंधीत विभागाच्या अधिकार्‍यांना केल्या आहेत.