Wed, Jun 26, 2019 18:28होमपेज › Satara › अहिरेच्या दत्तात्रयची सहल ठरली अखेरची

अहिरेच्या दत्तात्रयची सहल ठरली अखेरची

Published On: Jul 30 2018 1:32AM | Last Updated: Jul 29 2018 11:37PMखंडाळा : वार्ताहर 

सर्वांशी मनमिळावू अन् शांत संयमी,पर्यटनातून देशाटन करण्याची आवड असलेला दत्ता अखेरच्या पर्यटनास निघून गेला. तो कधी न येण्यासारखा, त्यांच्या जाण्याने आईसह चिमुकल्यांनी धाय मोकलून टाहो फोडला. त्यांच्या या आक्रोशामुळे परिसरातील वातावरण गहिवरले होते. दत्तात्रयने अचानक अशी एक्झिट घेतल्याने सर्वच जण सुन्‍न झाले होते. 

कोकण कृषी विद्यापीठातील दापोली येथील कर्मचार्‍यांच्या बसला आंबेनळी घाटात अपघात झाला. यामध्ये 33 कर्मचार्‍यांचा मृत्यू झाला. यामध्ये अहिरेतील दत्तात्रय जाधव यांचाही समावेश होता. शनिवारी दुपारपासून अहिरे सह खंडाळा तालुक्यातील नागरिक या घटनेची माहीती घेत होते. आबालवृद्धांसह मोठा मित्रपरिवार दत्तात्रयची शनिवार पासुन वाट पहात होता. त्याच्या मित्रपरिवारात त्याला पाहाण्याची आस लागून राहिली होती. रविवारी सकाळी एनडीआरएफच्या पथकाने दत्तात्रयाचा मृतदेह बाहेर काढला. यानंतर दुपारी त्यांचा मृतदेह अहिरे या त्यांच्या मुळ गावी आणण्यात आला. 

दत्तात्रयच्या जाण्याची माहिती जाणीवपूर्वक त्याच्या आई-वडीलांपासून लपवून ठेवण्यात आली होती. यानंतर रविवारी सकाळी त्यांना या घटनेची माहिती देण्यात आली. दुपारी दीडच्या सुमारास दत्तात्रयचा मृतदेह रूग्णवाहिकेतून अहिरेत पोहचताच त्याच्या आई-वडीलांनी एकच हंबरडा फोडला. त्यांचा आक्रोश पिळवटून टाकणारा होता. त्यांच्या चेहर्‍यावरील भाव जाणून अंत्यविधीस आलेल्या लोकांनाही आपले अश्रू आवरता आले नाही.  

आंबेनळी अपघाताचे खंडाळ्यावरही सावट पडल्याने पंचायत समितीचा नियोजित अब्यास दौरा रद्द करण्यात आला होता. ‘आपल्या गावाकडची माणस आली आहेत. त्यांना सर्व काही दाखवू या, खंडाळकरांना दापोली कृषी विदयापीठाचा कोपरान् कोपरा दाखवून देण्यात दत्तात्रय आघाडीवर होता’ त्याच्या आकस्मित जाण्याने तालुकावासियांना त्यांचे ते शब्द आठवत होते. त्या आठवणीतच सर्व जण गहिवरून गेले होते.दुपारी दीडच्या सुमारास शववाहिका अहिरेत दाखल झाली. यानंतर त्याचा मृतदेह निवासस्थानासमोेर दर्शनार्थ ठेव्यात आला होता. दत्तात्रयच्या अंत्यविधीला जनसैलाब उसळला होता. यांतर अहिरे येथील स्मशानभूमीत शोकाकूल वातावरणात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले . यावेळी सभापती मकरंद मोटे , माजी जि. प. उपाध्यक्ष नितीन भरगुडे , माजी सभापती प्रा. एस. वाय. पवार, युवा नेते विराज  शिंदे, अजय धायगुडे, माजी  सभापती रमेश धायगुडे यांच्यासह तालुक्यातील नागरिक उपस्थित होते .