Tue, Mar 19, 2019 05:12



होमपेज › Satara › आगाशिव डोंगर : विकास रखडला

आगाशिव डोंगर : विकास रखडला

Published On: Apr 30 2018 1:47AM | Last Updated: Apr 29 2018 7:51PM



पाच ते सहा वर्षापूर्वी 35 कोटींच्या निधीची घोषणा करत आगाशिव डोंगर पर्यटन केंद्र म्हणून विकसित करण्यात येणार असल्याचे शासनाने जाहीर केले होते. त्यावेळी या ठिकाणी रोप वे, लहान मुलांची रेल्वे, नौका विहार, बाल उद्यान, पर्यटन विकास मंडळाचे विश्रामगृह, हॉटेल, वनसंरक्षण कुटी, निरीक्षण मनोरे, वनौषधींची लागवड ही कामे करण्यात येणार होती. मात्र निधीची कमतरता आड आल्याने आगाशिव पर्यटन केंद्र नावारूपास येऊ शकलेले नाही.

पुणे- बंगळूर महामार्गाच्या पश्‍चिमेस जखीणवाडी, आगाशिव व चचेगाव परिसरातील डोंगर रांगात या लेणी वसल्या आहेत. सुमारे 300 वर्षांपूर्वी एकाच दगडात कोरलेल्या या लेणी व वास्तुशिल्प व कोरीव कामाचा एक नमुना आहे. जखीणवाडीच्या दक्षिणेला 23 लेणी आहेत. त्याच डोंगराच्या उत्तरेला एका कड्याच्या बाजूला आगाशिव परिसरात 19 लेणी आहेत. शिवाय सर्व डोंगर परिसरात मिळून आणखी 30 हून अधिक लेणी आहेत. चचेगाव परिसरातील डोंगर रांगातही लेण्या आढळून येतात. त्या परिसरात पिण्याच्या पाण्यासाठी खोदलेली टाकीही आहे. या लेण्यांपैकी सहा ठिकाणी चैत्यगृहे (प्रार्थना गृह) व काही विहार (वसतिगृह) आहेत. त्याचबरोबर काही लेण्या कोरलेल्याही आहेत. काही कोरीव लेण्यांची पडझड झाल्यामुळे त्यावरील नक्षी सध्या दिसत नाही. शहरापासून निसर्गरम्य परिसरात या लेण्या वसल्या असूनही राज्यकर्त्यांच्या प्रबळ इच्छाशक्तीअभावी गेली अनेक वर्षे त्यांचा विकास रखडला आहे. 

या बौद्धकालीन लेणींचा आणि परिसराचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास करण्यासाठी वन विभागाच्या वतीने दोन प्रस्ताव तयार करण्यात आले होते. मात्र, त्याची दखलच शासन स्तरावर घेण्यात आलेली नव्हती. त्यानंतर सहा ते सात वर्षापूर्वी पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्यासाठी वन विभागाने 35 कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार केला आहे. त्यामध्ये वारुंजी ते आगाशिव डोंगरा दरम्यान रोप - वे, लहान मुलांसाठी पार्क, पायथा ते लेण्यापर्यंतचा अंतर्गत रस्ता, तेथील पाण्याची तळ्यांचा विकास, श्‍वापदासांठी जंगली वृक्षांची लागण, बाग- बगीचा, लहान मुलांची रेल्वे, नौकाविहार, पर्यटन विकास मंडळाचे विश्रामगृह, हॉटेल, पवनचक्क्या, वनसंरक्षण कुटी, निरीक्षण मनोरे, वाहनतळ, तंबू, सौर पथदिवे, अंतर्गत डांबरी रस्ते, युवकगृह व माहिती केंद्र अशी कामे होणार होती. मात्र निधीअभावी रखडलेले काम आता केव्हा पूर्ण होणार? असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

- चंद्रजित पाटील