Tue, May 21, 2019 04:26होमपेज › Satara › वृद्धाच्या खुनानंतर बोरगावात बंद

वृद्धाच्या खुनानंतर बोरगावात बंद

Published On: Aug 15 2018 1:26AM | Last Updated: Aug 15 2018 12:04AMवेणेगाव : वार्ताहर 

सातारा तालुक्यातील बोरगाव येथे वृद्धाचा खून करून तिघांजणांना गंभीर जखमी करणार्‍या संशयित विशाल प्रल्हाद शितोळे (वय 22, रा.आंबेवाडी ता.सातारा) याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. गुन्ह्यातील चाकूही जप्त करण्यात आला आहे. दरम्यान, खून करुन तिघांना भोकसणार्‍या या घटनेच्या निषेधार्थ बोरगावमध्ये नागरिकांनी उत्स्फूर्त बंद पाळला. 

बोरगाव येथे सोमवारी रात्री संशयिताने विजय तातोबा साळुंखे (वय 65) यांच्यासह चौघांवर  चाकूने वार केले होेते. त्यामध्ये विजय साळुंखे हे ठार झाले तर दीपक नामदेव साळुंखे, उत्तम रंगनाथ माळवे व अनिल शंकर देशमुख हे तिघेही गंभीर जखमी झाले. या घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक विजय पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राजमाने यांनी घटनास्थळी धाव घेत कारवाईबाबतच्या सूचना बोरगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष चौधरी यांना दिल्या. घटनेनंतर बोरगाव येथील प्रक्षुब्ध जमावास शांत करत योग्य दिशेने तपास करून दोषींवर कडक कारवाई केली जाणार असल्याचे संतोष चौधरी यांनी सांगितले. या घटनेत संशयिताने वापरलेला चाकू पोलिसांनी जप्त केला असून जखमींना उपचारासाठी सातारा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

सोमवारी रात्री झालेल्या घटनेचे पडसाद मंगळवारी सकाळी उमटले. या घटनेचा निषेध म्हणून बोरगाव ग्रामस्थांनी उत्स्फूर्त बंद पाळून संशयितावर कडक कारवाई करण्याची मागणी पोलिसांकडे केली. दरम्यान, संशयित आरोपीच्या घरासमोर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी  बोरगाव पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. घटनेची फिर्याद उत्तम रंगनाथ माळवे यांनी बोरगाव पोलीस ठाण्यात दिली आहे. अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राजमाने यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष चौधरी करीत आहेत.