Mon, Aug 19, 2019 07:20होमपेज › Satara › ‘गुरू’च्या मृत्यूनंतर ‘शिष्याची’आत्महत्या

‘गुरू’च्या मृत्यूनंतर ‘शिष्याची’आत्महत्या

Published On: Mar 06 2018 1:55AM | Last Updated: Mar 06 2018 1:28AMसातारा : प्रतिनिधी

शुक्रवार पेठेतील गजानन बाबुराव घाडगे (कारंजकर) (वय 65) यांनी सोमवारी सकाळी घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. दरम्यान, गोडोलीतील साईबाबा मंदिराचे साईरंग महाराज यांच्या निधनाचे दु:ख सहन न झाल्याने त्यांचे शिष्य असलेल्या घाडगे यांनी आत्महत्या केल्याचे कुटुंबीयांनी म्हटले आहे. गुरूच्या मृत्यूनंतर शिष्याने आत्महत्या केल्याच्या या घटनेने परिसरासह सातार्‍यात खळबळ उडाली आहे. 

सद्गुरू श्री साईबाबा मंदिर संस्था गोडोली, साताराचे संकल्पक, संस्थापक अध्यक्ष पांडुरंग शंकरराव भुजबळ ऊर्फ श्री साईरंग महाराज यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले आहे. शुक्रवार पेठेत राहणारे गजानन घाडगे हे त्यांना गुरू मानत होते. याशिवाय घाटगे यांचे राजवाडा येथे दुकान असून ते व्यापारी आहेत.  आठ दिवसांपूर्वी ते परगावी गेले होते. परगावावरून रविवारी सातार्‍यात आल्यानंतर साईरंग महाराज यांचा मृत्यू झाला असल्याचे गजानन घाडगे यांना समजले. या घटनेने ते कमालीचे व्यथित झाले. गुरूचा मृत्यू झाल्याने त्यांनाही नेराश्य आले.

सोमवारी सकाळी गजानन घाडगे यांच्या पत्नी किचनमध्ये गेल्यानंतर  त्यांना पती गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसले. कुटुंबियांनी त्यांना गळफास काढून तत्काळ रुग्णालयात नेले. मात्र  त्यांचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. गजानन घाडगे यांचा मृत्यू झाल्याचे समजताच परिसरात गर्दी उसळली. शाहूपुरी पोलिसांना या घटनेची माहिती समजल्यानंतर त्यांनी रुग्णालयात व घटनास्थळी धाव घेतली.पोलिसांनी घाडगे कुटुंबियांकडे प्राथमिक चौकशी केल्यानंतर गजनान घाडगे यांची साईरंग महाराज यांच्यावर नितांत श्रध्दा होती. साईरंग महाराजांचा मृत्यू झाल्यानंतर ते कमालीचे व्यथित झाले होते. त्या नैराश्यातूनच घाडगे यांनी आत्महत्या केली असल्याचे कुटुंबियांनी पोलिसांकडे जबाब दिला आहे. गुरुच्या मृत्यूनंतर शिष्याने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेचा शाहूपुरी पोलिस पुढील तपास करत आहेत.