Wed, Jan 23, 2019 10:40होमपेज › Satara › ४३ पदकानंतरही ‘तो’ खेळाडू उपेक्षितच

४३ पदकानंतरही ‘तो’ खेळाडू उपेक्षितच

Published On: Apr 23 2018 1:18AM | Last Updated: Apr 22 2018 10:20PMउंडाळे : प्रतिनिधी 

जिल्हास्तरापासून राष्ट्रीय स्तरापर्यंतच्या विविध शरीरसौष्ठव स्पर्धात चमकदार कामगिरी करत तब्बल 43 पदके मिळवणार्‍या उंडाळे (ता. कराड) प्रमोद पाटील हा खेळाडू उपेक्षितच राहिला आहे. प्रत्येक महिन्याला जवळपास 25 ते 30 हजारांच्या घरात करावा लागणारा खर्च परवडत नसल्याने तो या क्रीडा प्रकारालाच रामराम ठोकण्याच्या तयारीत आहे. 

प्रमोद पाटील यांनी 2001 ते 2009 या आठ वर्षात राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत 4 सुवर्ण पदके, 2 रौप्य पदक तर 4 कांस्य पदके अशी 10 पदके मिळवली आहेत. तर राष्ट्रीय स्पर्धेत 4 सुवर्ण पदके, 3 रौप्य पदके, 4 कांस्य पदके अशी 11 पदके मिळवली आहेत. मात्र असे असूनही प्रमोद पाटील यांच्या या चमकदार कामगिरीची दखल अजूनही शासनाने घेतलेली नाही. नुकत्याच झालेल्या प्रतिष्ठेच्या ‘मुंबई श्री’ या स्पर्धेतही त्याने 75 ते 80 किलो वजन गटात पाचवा क्रमांक पटकावून महाराष्ट्राच्या संघात स्थान मिळवले आहे.

हा संघ राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करणार आहे. मात्र असे असले तरी बॉडी बिल्डिंग हा खूप खर्चिक क्रीडा प्रकार आहे. हा खर्च करण्यासारखी प्रमोद पाटील यांची परिस्थिती नाही. प्रत्येक महिन्याला किमान पंचवीस ते तीस हजार रुपये खर्च होतो. आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने आणि शासनासह कोणाकडूनही आर्थिक आधार मिळत नसल्याने प्रमोद पाटील हे अक्षरश: मेटाकुटीला आले आहेत. यापूर्वी शासनासह लोकप्रतिनिधींकडून दखल घेऊन आर्थिक हातभार लागेल, अशी अपेक्षा पाटील यांना होती. मात्र ही अपेक्षाच आता फोल ठरली आहे.

त्यामुळे हताश होत पाटील यांनी हा क्रीडा प्रकार सोडण्याच्या विचार सुरू केला आहे. त्यामुळेच शासनासह लोकप्रतिनिधींना आता तरी जाग येणार का? असा प्रश्‍न निर्माण झाला असून प्रमोद पाटील यांना न्याय मिळेल का? याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

 

Tags : satara, satara news, Bodybuilding, Pramod Patil, neglected,