Wed, Mar 27, 2019 03:57होमपेज › Satara › सात वर्षानंतर पुन्हा विमान प्रशिक्षण

सात वर्षानंतर पुन्हा विमान प्रशिक्षण

Published On: Apr 20 2018 1:19AM | Last Updated: Apr 19 2018 10:31PMकराड : प्रतिनिधी 

कराड विमानतळावर हवाई उड्डाण प्रशिक्षण संस्था सुरू करण्यास राज्य शासनाने मान्यता दिल्याने तब्बल सात वर्षांनी पुन्हा एकदा कराड शहर व परिसरातून छोटी - छोटी विमाने घिरट्या घालताना दिसणार आहेत. त्याचबरोबर प्रशिक्षण संस्था सुरू झाल्यावर कराडमधील व्यवसाय वाढीस चालना मिळणार असून राज्य शासनाच्या तिजोरीतही याची भर पडणार आहे.

बुधवारी मुंबईतील महाराष्ट्र विमानतळ प्राधिकरणाची मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीत प्रशिक्षण संस्थेबाबत निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी 2009 ते 2011 या दोन वर्षाच्या कालावधीत कराड विमानतळावर प्रशिक्षण दिले जात होते. त्यावेळी अ‍ॅकॅडमी ऑफ कारवार एव्हिएशन प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेकडून राज्य शासनाच्या मान्यतेनंतर विमान उड्डाणाचे प्रशिक्षण दिले जात होते. मात्र 2011 नंतर हे प्रशिक्षण बंद करण्यात आले होते. तेव्हापासून केवळ राजकीय व्यक्ती तसेच अनेकदा काही उद्योगपती यांची खाजगी विमानेच कराड विमानतळावरून उड्डाण करताना दिसतात.

आता पुन्हा एकदा हवाई उड्डाण प्रशिक्षण संस्थेस मान्यता मिळाल्याने लवकरच याबाबतची निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन प्रत्यक्ष प्रशिक्षणास प्रारंभ होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. या प्रशिक्षण संस्थेमुळे पश्‍चिम महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थी कराडमध्ये दाखल होणार आहेत. त्यामुळेच हॉटेल, जिल्ह्यातील पर्यटन व्यवसाय यालाही चालना मिळणार आहे.

याबाबत कराड विमानतळाचे व्यवस्थापक कृणाल देसाई यांच्याशी संपर्क साधला असता या निर्णयामुळे विमानतळाचा दैनंदिन वापर होण्याबरोबर शासनाला महसूल मिळणार आहे. कराड शहरासह परिसराच्या विकासालाही यामुळे हातभार लागणार आहे. निविदा प्रक्रियेनंतरच चित्र स्पष्ट होईल, असा विश्‍वास देसाई यांनी दै. ‘पुढारी’शी बोलताना व्यक्त केला आहे.

दरम्यान, माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी प्रयत्न केला होता. त्यानंतर स्थानिक शेतकर्‍यांसह ग्रामस्थांनी या निर्णयाविरूद्ध उठाव करत या निर्णयाला जोरदार विरोधही केला होता. त्यामुळेच स्थानिकांना विश्‍वासात घेत समन्वयाने मार्ग काढत कराड विमानतळाचे विस्तारीकरण होणे आवश्यक आहे.

मुख्यमंत्र्यांचे कराडवर विशेष लक्ष : ना. चरेगावकर

राज्य शासनाच्या या निर्णयामुळे मुख्यमंत्र्यांचे कराडच्या विकासावर किती लक्ष आहे? याची प्रचिती येते. देशाच्या कानाकोपर्‍यातील लोक विशेषतः विद्यार्थी याठिकाणी विमान उड्डाण प्रशिक्षण घेण्यासाठी येणार असल्याने उद्योग, व्यवसायांनाही चांगले दिवस येतील, असा विश्‍वास राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर यांनी व्यक्‍त केला आहे.