Thu, Apr 25, 2019 11:27होमपेज › Satara › आदित्यचे डॉक्टर होण्याचे स्वप्न अधुरे

आदित्यचे डॉक्टर होण्याचे स्वप्न अधुरे

Published On: May 09 2018 1:51AM | Last Updated: May 08 2018 10:23PMमारूल हवेली : वार्ताहर

शाळेत प्रथम येणारा आदित्य उर्फ अमृत सुर्यकांत पवार (वय 19) रा. काळोली, पाटण याला डॉक्टर होण्याची इच्छा होती. बारावी नंतर एम.बी.बी.एस. ला प्रवेश घेण्याचा प्रयत्नही केला. मात्र केवळ दोन टक्के गुण कमी असल्याने  त्याला प्रवेश मिळू शकला नाही. गुण कमी असलेल्या आरक्षित विद्यार्थ्यांचा एम.बी.बी.एस. ला प्रवेश झाला. आदित्यने नाईलाजास्तव पुणे येथे कृषी पदविकेला प्रवेश घेतला. पण डॉक्टर होण्याचे स्वप्न अपुरेच राहिल्याची सल मनात राहून नैराश्य ओढावले. या नैराश्यातूनच अदित्यचा अंत झाला असण्याची चर्चा परिसरात आहे.

काळोली येथील आदित्य उर्फ अमृत पवार याने राहत्या घरी रविवार दि. 6 रोजी गळफास घेवून आत्महत्या केली. आदित्य हा लहानपणापासून शाळेत हुषार विद्यार्थी म्हणून ओळखला जायचा. आई - वडील दोघेही शिक्षक असल्याने त्याच्यावर शैक्षणिक संस्कार होते. तो पहिली पासून वर्गात आणि शाळेत प्रथम क्रमांक पटकावयाचा. इयत्ता 10 वी ला माने - देशमुख विद्यालय  येथे 89.40 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. तर  कराड येथील यशवंतराव चव्हाण शास्त्र महाविद्यालयात बारावीच्या परीक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होऊन 92 टक्के गुण मिळवले. डॉक्टर होऊन जनसेवा करण्याची  आदित्यची खूप इच्छा होती. त्यासाठी आई - वडीलांचे देखील अदित्यला पाठबळ होते. बारावीच्या निकालानंतर अदित्यने एम.बी.बी.एस. प्रवेश घेण्याचा प्रयत्न केला. मात्र खुल्या मेरीटला  केवळ दोन टक्के मार्क कमी पडले म्हणून त्याचा एम.बी.बी.एस. प्रवेश नाकारला गेला.  मात्र मार्क कमी असलेल्या आरक्षित विद्यार्थ्यांचा एम.बी.बी.एस. ला प्रवेश झाला. तेंव्हा पासून अदित्य निराश होता.

आदित्य पुण्यावरून सुट्टीला गावी आई - वडीलांच्याकडे आला होता. रविवारी आई - वडील बाहेर गावी लग्नाला गेले असत्याने तो घरी एकटाच होता. या दरम्यान आदित्यने गळफास घेऊन स्वतः ची जीवन यात्रा संपवली. मराठा समाजातील अदित्यचे डॉक्टर होण्याचे स्वप्न अपुरेच राहून गेले. गेल्या वर्षी मुंबई येथील मराठा क्रांती मुक मोर्चा वेळी मराठा समाजाला सहा महिन्यांत आरक्षण देण्याचे आश्‍वासन सरकारने दिले होते. या आश्‍वासनाला वर्ष उलटून गेले तरी मराठा समाजाच्या आरक्षणा बाबतीत सरकार ब्र शब्द काढायला तयार नाही. त्यामुळे अजून असे किती आदित्य जाण्याची वाट सरकार पहाणार, असा प्रश्‍न नागरिकांमधून विचारला जात आहे.