Mon, Nov 19, 2018 16:49



होमपेज › Satara › बाजारात चांदीची तबके, भेटवस्तू विक्रीस : लाखोंची होतेय उलाढाल 

अधिक मासात जावयांची चांदी

Published On: May 22 2018 1:29AM | Last Updated: May 21 2018 8:40PM



सातारा : मीना शिंदे

अधिक मासात जावयाला  संपूर्ण पोषाखासह चांदीचे निरंजन व अनारशे बत्ताशांचे तबक देण्याच्या  प्रथा असल्यामुळे जावयांसाठी सुगीचे दिवस सुरु झाले आहेेत. अधिक मासातील नवविवाहित जावयाला वाण देण्यासाठी आकर्षक चांदीचे दिवे, तबके विक्रीसाठी आली आहेत. चांंदीला मागणी वाढल्याने चांदी चांगलीच  वधारली असून अधिक मासात लाखोंची उलाढाल होणार आहे.

अधिक ज्येष्ठ मासास प्रारंभ झाला असून जावयांसाठी हा सुगीचा महिना ठरत असतो. विशेषतः नवविवाहितांसाठी सासरवाडीहून भेटवस्तूंची रेलचेल सुरू होते. कुठल्याही गोष्टीचे मार्केटिंग करण्याच्या अलीकडच्या जमान्यात अधिक मासाचंही मार्केटिंग छान होऊ लागलं आहे. त्यात साहजिकच सुवर्णपेढ्या आणि मिठाई व्यापारी आघाडीवर आहेत. आकर्षक सजावटीमध्ये दुकानात अनारसे, बत्तासे, म्हैसूरपाक यांची पाकिटे तयार करून व्यापार्‍यांनी ठेवली आहेत; तर सुवर्णपेढ्यांनीही जावयांना खूश करण्यासाठी आकर्षक चांदीचे दिवे, तबके आणली आहेत.

अधिक महिना सुरू झाल्याने सर्वत्र जावयाच्या वाणाची आणि धोंड्याच्या जेवणाची चर्चा सुरू झाली आहे. जावयांना धोंड्याचे आमंत्रण दिले जाऊ लागले आहे. पहिल्या अधिक मासाला संपूर्ण पोषाखासह चांदीचे तबक देण्याची प्रथा आहे.   या तबकात 33 अनारसे ठेवून त्यामध्ये निरंजन ठेवून दीप प्रज्वलित करून जावयाला वाण दिले जाते. अनारशांऐवजी बत्तासे किंवा म्हैसूरपाक या पदार्थांचे वाण देण्याचीही पद्धत आहे. अनार0से हल्ली घरोघरी बनवले जात नसल्याने तयार अनारसे खरेदीकडे नागरिकांचा कल आहे. या अनारशांच्या ऑर्डर दिल्या जाऊ लागल्या आहेत. जावयाकडूनही सासूला साडी दिली जात असल्याने कापड व्यापारातही मोठी उलाढाल होणार आहे.

अनारसे, बत्तासे, म्हैसूर पाक आदी पदार्थ आकर्षक सजावटीमध्ये पॅकिंग केलेले दुकानांत दिसू लागले आहेत. चॉकलेट ठेवूनही हे पदार्थ सजवले आहेत. यासोबतच जावईबापूंना कपडे, दागिने, भांडीस्वरूपात वस्तू भेट दिल्या जातात. या वस्तू खरेदी करण्यासाठी नागरिकांनी बाजारात गर्दी होवू लागली आहे. सुवर्णपेढ्यांमध्ये चांदीचे तबक, चांदीचे दिवे, लक्ष्मीनारायण, देवी देवतांंच्या मूर्ती भेट म्हणून नागरिक खरेदी करत आहेत.

अधिक मासाचे महत्त्व

अधिक मासास पुरुषोत्तम मास, धोंड्या महिना असेही म्हणतात. दोन अधिक मासांमध्ये कमीत कमी 27 महिने आणि जास्तीत जास्त 35 महिने अंतर असते. चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, आश्विन, कार्तिक आणि फाल्गुन यापैकी कोणताही महिना अधिक मास होऊ शकतो. गरीब, गरजू लोकांना मदत मिळावी, यासाठी अधिक मासामध्ये दान देण्यास सांगितले आहे. 33 अनारसे, दीप यांचे दान दिले जाते. आधुनिक काळात अन्नदान, वस्त्रदान, विद्यादान, श्रमदान, रक्तदान, अर्थदान, ग्रंथदान करणेही जास्त योग्य आहे.

शुभेच्छा अन् जेवणाचा आग्रह.

अधिक महिन्याचेही सोशल मीडियावर जावयांना धोंड्याच्या महिन्याच्या शुभेच्छा व आमंत्रण दिले जात आहे. अधिक मास (धोंडा महिना)च्या जेवणाचा आग्रह जावयांना सर्व ज्येष्ठ करीत आहेत. अधिकमासाच्या या पंगतीत धोंड्याला महत्त्व असून पुरण घालून केलेल्या चौकोनी पदार्थाला दिंड म्हणतात; तर त्याला गोल आकार दिला की धोंडा म्हणतात. हा धोंडा वाफेवर उकडला जातो आणि गरम-गरम वाढला जातो. वाढल्यानंतर तो मधोमध फोडून त्यात साजूक तूप घालून खायला दिला जातो.