Thu, Jul 18, 2019 02:07होमपेज › Satara › चुकीच्या कागदपत्रांद्वारे बदली करून घेणार्‍यावर कारवाई

चुकीच्या कागदपत्रांद्वारे बदली करून घेणार्‍यावर कारवाई

Published On: Jun 30 2018 1:20AM | Last Updated: Jun 29 2018 10:46PMसातारा : प्रतिनिधी

जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेत चुकीच्या कागदपत्रांच्या आधारे बदली करून घेतलेल्या  शिक्षकांवरील कारवाई व त्यांच्या झालेल्या बदल्यांबाबत  कार्यवाही करण्याचा फतवा राज्याच्या ग्रामविकास विभागाने काढला असून त्याबाबत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना आदेश दिले आहेत.

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षक, पदवीधर शिक्षक व मुख्याध्यापकांच्या  जिल्हाअंतर्गत बदलीची प्रक्रिया शासन निर्णयानुसार राबवण्यात आली. अशा बदल्या करताना विशेष संवर्ग भाग 1, विशेष संवर्ग भाग 2 यामध्ये मोडणार्‍या  शिक्षकांनी त्यांचे अर्ज भरताना संपूर्ण खरी व  वस्तुस्थितीदर्शक माहिती भरून अर्ज करणे अपेक्षित आहे. शिक्षकी पेशा हा उदात्त पेशा असल्यामुळे  व भावी  पिढी घडवण्याची  जबाबदारी शिक्षकांवर असल्याने त्यांच्याकडून अर्ज भरताना बनावट प्रमाणपत्रे, कागदपत्रे सादर केली जाणार असे अपेक्षित होते.मात्र काही शिक्षकांकडून संबंधित संवर्गाची पात्रता धारण करीत नसतानाही जाणीवपूर्वक खोट्या व चुकीच्या माहितीच्या आधारे अर्ज भरलेले आहेत. असे अर्ज भरून त्यांनी बदल्या देखील करून घेतलेल्या आहेत, अशा तक्रारी ग्रामविकास विभागाकडे प्राप्त झालेल्या आहेत.

अशा खोट्या  व चुकीच्या माहितीच्या आधारे जर काही शिक्षकांनी बदल्या करून घेतलेल्या  असतील तर अशा स्वरूपाच्या  तक्रारीची विहित वेळेत चौकशी करून संबंधित शिक्षक दोषी आढळल्यास त्यांच्यावर तात्काळ कारवाई करणे अपेक्षित आहे.

विशेष संवर्ग 1 व 2 मध्ये ज्या शिक्षकांनी अर्ज भरून बदली करून घेतलेली आहे व त्या शिक्षकांबद्दल तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत अशा शिक्षकांची, बदलीच्या संबंधित संवर्गाच्या कागदपत्रांच्या तात्काळ पडताळणी करण्यात यावी. ही पडताळणी करताना नैसर्गिक न्याय म्हणून त्यांना म्हणणे मांडण्याची संधी देण्यात यावी. या पडताळणीचे काम दि. 10 जुलैपर्यंत करण्यात यावे.अशी पडताळणी करताना एखाद्या शिक्षकाने जाणीवपूर्वक खोटी व दिशाभूल  करणारी माहिती भरून बदली करून घेतलेली आहे, अशी बाब आढळल्यास संबंधित शिक्षकांविरूध्द कारवाई करणे आवश्यक आहे.त्यासाठी संबंधित शिक्षकांची एक वेतनवाढ कायमस्वरूपी बंद करण्याची कारवाई करण्यात यावी.

खोट्या माहितीच्या आधारे विशेष संवर्ग भाग 1 व 2 मध्ये ज्या शिक्षकांनी बदल्या करून घेतल्या आहेत अशा शिक्षकांनी ज्यांना विस्थापित केलेले आहे अशा बदलीपात्र शिक्षकांना रॅन्डम राउंडमध्ये बदली मिळाली असेल तर  त्या शिक्षकांच्या  पदावर अशा विशेष संवर्ग भाग 1 व 2 चा खोटा दावा करून बदली मिळवलेल्या  शिक्षकांना मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी पदस्थापना द्यावी आणि विस्थापित झालेल्या  शिक्षकांना त्यांच्या मूळ जागी पुनर्पदस्थापना द्यावी. ही कार्यवाही 20 जुलैपूर्वी  करण्यात यावी. संबंधित विस्थापित शिक्षकांना त्यांच्या विनंतीनुसार बदली  मिळालेली असल्यास खोट्या माहितीच्या आधारे बदली करून घेतलेल्या शिक्षकांना  पुढील वर्षी बदली प्रक्रियेमध्ये थेट रॅन्डम राउंडमध्ये घेवून त्याची बदली त्या पदावरून करण्यात यावी, असेही काढलेल्या आदेशात म्हटले आहे.

दरम्यान,जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेत रॅन्डम राउंडमध्ये बदली झालेल्या शिक्षकांना त्यांच्या पसंतीक्रमानुसार शाळा देण्याबाबत कार्यवाही करण्याबाबतचा आदेश ग्रामविकास विभागाने काढला आहे.