Tue, Mar 26, 2019 22:08होमपेज › Satara › वेणेगावात वाळू उपशावर कारवाई

वेणेगावात वाळू उपशावर कारवाई

Published On: Mar 18 2018 1:05AM | Last Updated: Mar 17 2018 11:24PMसातारा : प्रतिनिधी

वेणेगाव (ता. सातारा) येथे कृष्णा नदीपात्रात सुरू असलेल्या बेकायदा वाळू उपशावर सातारा प्रांताधिकारी डॉ. स्वाती देशमुख, तसेच तहसीलदार नीलप्रसाद चव्हाण यांच्या पथकाने कारवाई केली. गट नं. 211/2 मध्ये वाळूचा बेकायदा साठा जप्‍त करून जेसीबी, ट्रॅक्टर, तसेच यांत्रिक यारीही ताब्यात घेतली. संबंधितांना सुमारे 9 लाख 70 हजार 250 रुपयांचा दंड करण्यात आला असून, त्यांच्यावर बोरगाव पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

सातारा तालुक्यातील कामेरी, कोपर्डे, वेणेगाव परिसरात बेकायदा वाळू व्यावसायिकांचा धुडगूस सुरू आहे. महसूल विभागाच्या स्थानिक यंत्रणेचे दुर्लक्ष होत असल्याने या परिसरातील बेकायदा वाळू उपशाच्या प्रचंड तक्रारी येत आहेत. सातारा प्रांताधिकारी डॉ. स्वाती देशमुख, सातारा तहसीलदार नीलप्रसाद चव्हाण यांच्या पथकाने वेणेगावात अचानक कारवाई केली. त्यावेळी  मोहन आत्माराम घाडगे (रा. फत्यापूर) यांचा जेसीबी (एम.एच. 09 एक्यू 8605), तसेच आत्माराम घाडगे (रा. कामेरी) यांचा ट्रॅक्टर (एमएक्सएक्स 7903) जप्‍त करण्यात आला.

त्यांनतर मोहन घाडगे यांच्याच शेतात (गट नं. 211/2) बेकायदा उपसा केलेल्या वाळूचा साठा केला जात असल्याचे तपासात स्पष्ट झाले. कारवाईवेळी त्या ठिकाणी असलेली 5 ब्रास वाळू जप्‍त करण्यात आली. संबंधितांवर बोरगाव पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान, बेकायदा वाळूप्रकरणी 1 लाख 70 हजार 250, जेसीबीला 7 लाख, तर ट्रॅक्टरला 1 लाख रुपये अशी दंड आकारणी पंचनामे झाल्यावर सातारा तहसील कार्यालयाने सुरू केली आहे. या कारवाईत प्रांत कार्यालयातील जयंत जाधव, उदय कुलकर्णी यांच्यासह अंबवडे मंडलाधिकारी मुळीक, अपशिंगे मंडलाधिकारी एस. बी. जाधव, तलाठी म्हैसणवाड, भोसले, कुंभार सहभागी झाले होते. दरम्यान, कोपर्डे, तुकाईवाडी, कालगाव, दुर्गळवाडी, कामेरी परिसरात वाळूसम्रटांचा धुडगूस सुरू असून, कारवाईची मागणी होत आहे.

स्मशानभूमीसमोर वाळू उपशासाठी यारी

वेणेगावातील एक बहाद्दर बेकायदा वाळू उपसा करण्यात एवढा सराईत झाला होता की, त्याने वेणगाव-कोपर्डे स्मशानभूमीसमोर कृष्णा नदीत कायमस्वरूपी वाळू उपसा करण्यासाठी यांत्रिक यारी नदीतच ठेवली होती. सोयीनुसार वाळू उपसा करण्यासाठी या यांत्रिक यारीचा वापर केला जायचा. नदीपात्रातील वाळूचा उपसा करून त्या परिसरातील शेतात वाळूचा साठा केला जायचा. नंतर त्या ठिकाणाहून वाळूची तस्करी केली जात होती. याचा सविस्तर वृत्तांत दै. ‘पुढारी’ने दि. 17 रोजीच्या अंकात प्रसिद्ध केल्यावर महसूल विभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी पथकासह संबंधित ठिकाणांवर कारवाई केली. 

 

Tags : satara, satara news, venegaon, sand excavation, action,