Sat, Jul 20, 2019 23:20होमपेज › Satara › बेकायदा वाळू उपशावर कारवाई

बेकायदा वाळू उपशावर कारवाई

Published On: Mar 14 2018 12:49AM | Last Updated: Mar 14 2018 12:26AMसातारा : प्रतिनिधी

कामेरी (ता. सातारा) येथे कृष्णा नदीपात्रात सुरू असलेल्या बेकायदा वाळू उपशावर सातारा प्रांताधिकारी डॉ. स्वाती देशमुख, तसेच तहसीलदार नीलप्रसाद चव्हाण यांच्या पथकाने सोमवारी मध्यरात्री छापा टाकला. या कारवाईत ट्रॅक्टर तसेच जेसीबी जप्‍त करण्यात आला आहे.

कामेरी येथे कृष्णा नदीपात्रात वारंवार बेकायदा वाळू उपसा केला जात असल्याच्या तक्रारी आहेत. गेल्याच महिन्यात या ठिकाणी मोठी कारवाई करण्यात आली होती. त्यानंतरही त्या ठिकाणी बेकायदा वाळू उपसा सुरू असल्याची माहिती तालुका महसूूल विभागाला मिळाल्यानंतर सातारा प्रांताधिकारी     डॉ. स्वाती देशमुख तसेच तहसीलदार नीलप्रसाद चव्हाण यांच्या पथकाने सोमवारी मध्यरात्री बेकायदा वाळू उपशावर छापा टाकला. त्यावेळी  वाळू माफियांची पळापळ झाली. ट्रॅक्टरच्या ट्रालीवर चाळण लावून जेसीबीने वाळू उपसा केल्याचे निदर्शनास आले. मोहन आत्माराम घाडगे हे घटनास्थळी सापडले. त्यांचा ट्रॅक्टर जप्‍त करण्यात आला असून जेसीबी मालकाचा तपास सुरु आहे. घाडगे यांनी उपसा केलेल्या वाळूचा प्रतिब्रासप्रमाणे दंड भरावा लागणार आहे. शिवाय नव्या शासन निर्णयाप्रमाणे ट्रॅक्टर व जेसीबीला वेगळा दंड आकारला जाणार आहे. या प्रकरणी संबंधितांकडून सुमारे 5 लाखांचा दंड वसूल केला जाणार असल्याचे तहसील कार्यालयातून सांगण्यात आले. दरम्यान, सातारा तालुक्यात कसल्याही प्रकारचे बेकायदा गौण खनिज उत्खनन खपवून घेतले जाणार नाही. तसे कुणी सापडल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करणार, असा इशारा तहसीलदार नीलप्रसाद चव्हाण यांनी दिला. या कारवाईत उदय कुलकर्णी, जयंत जाधव, अभय पवार, सर्कल वनवे, कुंभार तसेच अंबवडे सर्कल व तलाठी यांनी सहभाग घेतला.