Wed, May 22, 2019 20:47होमपेज › Satara › १ एप्रिलपासून बेकायदा रिक्षांवर हातोडा

१ एप्रिलपासून बेकायदा रिक्षांवर हातोडा

Published On: Jan 25 2018 1:01AM | Last Updated: Jan 24 2018 9:59PMकराड :प्रतिनिधी 

31 मार्चपर्यंत रिक्षा आरटीओ कार्यालयाकडे नोंदणी करणे बंधनकारक आहे. त्यामुळे 1 एप्रिलपासून ज्या रिक्षा चालकांकडे योग्य ती कागदपत्रे नसतील आणि यापूर्वीच स्क्रॅपमध्ये काढलेल्या रिक्षा रस्त्यावर धावत असतील, तर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे संकेत कराडचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे यांनी दिले आहेत.

उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात झालेल्या पत्रकारपरिषदेत शिंदे यांनी ही माहिती दिली. निळकंठ पाटील यांच्यासह उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकारी यावेळी उपस्थित होते.

शिंदे यांनी जानेवारीपर्यंत 32 कोटींचा महसूल कराड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या माध्यमातून शासनाकडे जमा झाल्याचे सांगितले. तसेच ब्रेक टेस्ट ट्रॅक आता पूर्ण क्षमतेने सुरू झाला असून सांगली तसेच सातारा जिल्ह्यातील सर्व अवजड वाहनांचे पासिंग कराडला होण्याची शक्यताही आहे. याशिवाय एक ते दीड तासात लर्निंग लायसन्स देण्यात आमचे कार्यालय यशस्वी झाले असून झिरो पेडन्सींमध्येही कमालीचे यश आले आहे.

त्यामुळे कराड पॅटर्न म्हणून राज्यभर आता याची अंमलबजावणी होईल, अशी अपेक्षा व्यक्त करत 500 रूपयात रिक्षा चालकांना परमीटसाठी आवश्यक असलेले इरादापत्र दिले जात आहे. याशिवाय संबंधितांचे अभिप्रायही नोंदवण्यात आले आहेत, असेही शिंदे यांनी स्पष्ट केले.कराड शहरासह परिसरातील बेकायदा रिक्षांबाबत विचारलेल्या प्रश्‍नास उत्तर देताना 31 मार्चपर्यंत नोंदणी न झालेल्या रिक्षांवर कारवाई होणारच असल्याचे शिंदे यांनी सांगितले. याशिवाय शाळांना सुट्टी लागल्यानंतर स्कूल बसची तपासणी मोहिम हाती घेतली जाणार आहे. गेल्यावर्षी वाहतुकीस अयोग्य असणार्‍या दहा स्कूल बसचे परवाने रद्द करण्यात आले होते. त्याचप्रमाणे यावर्षीही कारवाई करण्यात येणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले आहे.

दुचाकी वाहनांची पुनर्नोदंणी करावी ...

15 वर्षापूर्वी अधिक काळ वापरलेल्या दुचाकी वाहनांची पुनर्नोदंणी आवश्यक आहे. अशा वाहनांकडून पर्यावरण टॅक्स घेतला जातो. हा टॅक्स टाळण्यासाठी दुचाकीची पुनर्नोदंणीच केली जात नाही. मात्र असे न केल्यास दंड आकारला जातो. त्यामुळे टॅक्सपेक्षा दंडाचीची रक्कम अधिक होऊ शकते, हे लोकांनी लक्षात घ्यावे, असे आवाहनही शिंदे यांनी यावेळी केले.