Wed, Jul 24, 2019 12:19होमपेज › Satara › गावठी दारूवर कारवाई; तिघांना अटक

गावठी दारूवर कारवाई; तिघांना अटक

Published On: Jan 30 2018 1:51AM | Last Updated: Jan 29 2018 10:31PMकराड : प्रतिनिधी

चिपळूण-कराड रस्त्यावर ढाणकल ता. पाटण येथे उत्पादन शुल्क विभागाने कारवाई करून हातभट्टीच्या दारूसह सुमारे अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी मुख्य सुत्रधारासह तिघांना अटक करण्यात आली आहे. रविवार दि. 28 रोजी रात्री 11.30 वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आल्याने अवैध दारुविक्रेत्यांत खळबळ उडाली आहे.

मुख्यसुत्रधार जगन्नाथ रामचंद्र कदम (रा. हेळवाक, पाटण), मिलींद भिमराव मोहिते, संतोष दाजी चव्हाण (दोघेही रा. ढाणकल, ता. पाटण) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. माहिती अशी की, चिपळूण तालुक्यातून पाटण व कराड तालुक्यात अवैध गावठी दारुची वाहतुक केली जात असल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. त्यानुसार उत्पादन शुल्क विभागाने वाहन तपासणी मोहिम राबवली.

तसेच एक पथक गस्त घालत असताना कोयनानगरजवळ घाटमाथा येथे चिपळूणकडून भरधाव वेगात जीप  (क्र. एमएच 08 सी. 4081) आली. उत्पादन शुल्कच्या गस्त पथकाला संशय आल्याने त्यांनी जीप थांबविण्याचा प्रयत्न केली. मात्र, चालकाने जीप न थांबविता पथकाला हुलकावणी दिली. त्यामुळे जीपचा पाठलाग करून सुमारे एक किलोमिटर अंतरावर पथकाने जीप अडवली. जीपची तपासणी केली असता त्यामध्ये 25 लिटर क्षमतेचे 8 प्लास्टीकच्या कॅनमध्ये गावठी हातभट्टीची अंदाजे 200 लिटर दारू आढळून आली. त्यामुळे मिलींद मोहिते व संतोष चव्हाण यांना ताब्यात घेऊन अटक केली. तसेच मुख्य सुत्रधार जगन्नाथ कदम यांना सोमवारी सकाळी अटक केली. तिघांवरही दारूबंदी कायद्यातंर्गत गुन्हा नोंद करण्यात आला. 

या कारवाईत हातभट्टीच्या दारुसह वाहतुकीसाठी वापरलेली जीप असा सुमारे 2 लाख 36 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक जयसिंग जाधव, सहाय्यक निरीक्षक संदीप लोहकरे, भीमराव माळी, विक्रम भोसले यांनी ही कारवाई केली. 

चिपळूण तालुक्यात कोळकेवाडीत हातभट्टीचा अड्डा..

चिपळूण तालुक्यातील कोळकेवाडी येथे हातभट्टी तयार करण्याचा अड्डा आहे. येथून रत्नागिरीसह इतर जिल्ह्यांमध्ये अवैधरित्या गावठी दारूचा पुरवठा होत असतो. याची माहिती मिळताच कराडच्या उत्पादन शुक्‍ल विभागाने रविवारी रात्री गावठी दारुची वाहतुक करणार्‍या वाहनावर कारवाई केली. कोळकेवाडी रत्नागिरी जिल्ह्यात येत असल्याने तेथे जाऊन पुढील कारवाई करता येत नसल्याने रत्नागिरीचे उत्पादन शुक्‍ल विभागाच्या अधिक्षकांशी संपर्क साधून याबाबतची माहिती दिली असल्याचे सातारा जिल्ह्याच्या अधिक्षिका स्नेहलता श्रीकर यांनी सांगितले.