होमपेज › Satara › खंडाळ्यात रोडरोमियोंवर कारवाईचा दंडुका

खंडाळ्यात रोडरोमियोंवर कारवाईचा दंडुका

Published On: Aug 22 2018 12:58AM | Last Updated: Aug 21 2018 11:17PMखंडाळा : वार्ताहर

खंडाळ्यातील सडकछाप रोडरोमियांच्या विरोधात खंडाळा पोलिसांनी कारवाईचा बडगा उचलला असून सोमवारी महाविद्यालया समोर 18 जणांवर कारवाई करण्यात आली. दै.‘पुढारी’ने आवाज उठवल्यानंतर पोलिसांनी टपोरींविरूध्द सुरु केलेल्या कारवाईचे पालक वर्गातून स्वागत होत आहे. ही कारवाई सातत्याने यापुढेही होऊन महिला व मुलींना सुरक्षित वातावरण निर्माण करावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे .

खंडाळ्यातील सडकछाप, धूम स्टाईल दुचाकी चालवणार्‍या रोडरोमियोंचा त्रास महिला , शाळकरी मुलींना होत आहे. त्यांच्यावर प्रशासनाकडून कोणतीही कारवाई होत नसल्याने महिला व मुलींमधून नाराजी व्यक्त होत होती. त्यावर दै.‘पुढारी’ने सडेतोड भूमिका मांडत एखादी अघटीत घटना घडल्यानंतरच प्रशासन कारवाई करणार का? असा सवाल उपस्थित केला होता. या वृत्ताची दखल घेत खंडाळा पोलिसांनी मंगळवारी रोडरोमियोंविरोधात कारवाईला सुरूवात केली. 

खंडाळ्यात असणार्‍या राजेंद्र महाविद्यालयासमोर सकाळी 10 वाजताच पोलिसांनी कारवाईला सुरूवात केली. सपोनि हनुमंतराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचार्‍यांनी कारवाई केली. सकाळपासूनच सडकाछाप व रोडरोमियोंवर पोलिसांनी पाळत ठेवली होती. त्यानुसार हुल्‍लडबाज मुलांवर कारवाई करण्यात येत होती. अचानकच चक्‍क महाविद्यालयासमोर पोलिस उभे असल्याने अनेकांची पाचावर धारण बसली होती. त्यामुळे विद्याथ्यार्र्मध्ये चर्चेला उत आला होता. दिवसभर पोलिसांचा वॉच विद्यार्थ्यांवर असल्याने मंगळवारी हा परिसर शांतच होता. दुचाकीवरून ट्रिपल सीट धुमस्टाईल कर्णकर्कश आवाज करीत पारगांव खंडाळा बस स्थानक ते  महाविदयालय  व पुढे शिवाजी चौक खंडाळा असे मुख्य रस्त्याने दुचाकी बेदरकारपणे चालवतात. अशा विद्यार्थ्यांवर कारवाईचा सपाटा सुरू करण्यात आला आहे. 

कारवाई करत असताना अनेक अल्पवयीन मुले वाहन चालवण्याचा परवाना नसतानाही दुचाकी चालवतात. अशा मुलांच्या पालकांवर, गाडीमालकांवर यापुढे कडक  कारवाई करण्यात येणार आहे. महिला व मुलींना होणार्‍या त्रासाबद्दलच्या तक्रारी पोलिस व निर्भया पथकाकडे मांडाव्यात, असे आवाहन सपोनि गायकवाड यांनी केले. 

या कारवाईमुळे महिला व युवतींमध्ये समाधानाचे वातावरण होते. फक्‍त एक दिवस अशी कारवाई न करता रोजच पोलिसांनी अशा प्रकारची कारवाई केल्यास महाविद्यालय परिसर शांत होईल, अशी आशा विद्यार्थ्यांना आहे. दरम्यान, ज्या 18 जणांवर कारवाई करण्यात आली त्यामध्ये महाविद्यालयाबरोबरच कॉलेजबाहेरील टपोरींचाही समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले.