Tue, Mar 26, 2019 23:55होमपेज › Satara › विचारवंतांवरील कारवाई ही सरकारची हुकूमशाही  : भारत पाटणकर

विचारवंतांवरील कारवाई ही सरकारची हुकूमशाही  : भारत पाटणकर

Published On: Sep 06 2018 1:57AM | Last Updated: Sep 05 2018 10:54PMकराड : प्रतिनिधी

विचारवंतांवर झालेली कारवाई ही भाजप सरकारची हुकूमशाही आहे, असे मत श्रमीक मुक्ती दलाचे नेते डॉ. भारत पाटणकर यांनी बुधवारी कराड येथे पत्रकारांनी बोलताना व्यक्त केले. 

डॉ. पाटणकर म्हणाले, भिमा कोरेगाव दंगल प्रकरणी पुणे पोलिसांनी विचारवंतांना अटक केली आहे.  प्रकरण न्यायप्रविष्ट असताना याबाबतचे पुरावेही त्यांनी माध्यमांसमोर  सादर केले. ते न्यायालयात किती टिकणार हा प्रश्‍नच आहे. तरीही हा प्रकार पाहिल्यानंतर पुणे पोलिसांच्या कार्यपध्दतीवर शंका उपस्थित होत आहे. पोलिस कोणाच्या तरी दबावाखाली काम करत आहेत असे वाटते. 

भिमा -कोरेगाव येथील दंगलीत दलित समाजातील लोकांच्या गाड्या जाळल्या, महिला, मुलांना मारहाण करण्यात आली, दगडफेक करण्यात आली. या प्रकरणी मिलिंद एकबोटेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोणत्या विचारांच्या लोकांनी दंगल भडकवली? त्याला खतपाणी कोणी घातले? हे उघड असताना पुणे पोलिसांनी अचानकपणे विचारवंतांवर केलेली कारवाई धक्कादायक आहे. दंगल भडकविण्यात ज्यांची नावे समोर आली आहेत त्यांना  अद्याप पोलिसांनी अटक केलेली नाही. यावरून पुणे पोलिसांनी विचारवंतांवर केलेली कारवाई आणि त्यांनी उघड केलेली माहिती याबाबत प्रश्‍नचिन्ह उपस्थित झाले आहे. डॉ.नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे, गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणाचा छडा लावा अन्यथा आम्ही संघटनेच्या वतीने कोंबींग ऑपरेशन राबवू असा इशारा दिल्यानंतर तपासाला गती आली. तरीही कर्नाटक पोलिसांनी अटकसत्र सुरू केल्यानंतर महाराष्ट्र पोलिस जागे झाले. येवढ्या दिवसात त्यांच्या हाती संशयित आरोपी का लागले नाहीत, असा सवालही डॉ. पाटणकर यांनी उपस्थित केला. सनातन संस्थेवर बंदी घालावी अशी मागणी अनेक संघटना व सूज्ञ  मंडळी करत आहे. मात्र सरकार याकडे सोईस्कर दुर्लक्ष करत आहे. हे सरकार विशिष्ट विचारसरणीचे आहे असेही डॉ. पाटणकर म्हणाले.