Mon, Aug 19, 2019 09:26होमपेज › Satara › ट्रॅपवेळी सापडले होते आणखी ७० हजार 

ट्रॅपवेळी सापडले होते आणखी ७० हजार 

Published On: Jul 24 2018 1:09AM | Last Updated: Jul 24 2018 12:12AMसातारा : प्रतिनिधी

औषध विक्री परवान्याचे नूतनीकरण करण्यासाठी सातारा येथील अन्‍न व औषध प्रशासन कार्यालयातील सहायक आयुक्‍त विनय दत्तात्रय सुलोचने (मूळ रा. ठाणे) आणि आरोग्य निरीक्षक सविता भास्कर दातीर (मूळ रा.पुणे) यांना 20 हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले होते. या कारवाईवेळी  सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला आणखी 70 हजार रुपये सापडले असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, सोमवारी दोघांना न्यायालयाने जामीन दिला असून आठवड्यातून दर मंगळवारी पुढील तपासासाठी हजेरी लावण्याचे आदेश दिले आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी, वाई येथील एका मेडिकलच्या दुकान चालकाने परवाना नुतनीकरणासाठी सातारा येथील अन्‍न व औषध विभागात अर्ज केला होता. हा  परवाना देण्यासाठी सहाय्यक आयुक्‍त विनय सुलोचने व सविता दातीर यांनी त्यांच्याकडे 20 हजारांची लाच मागितली. याबाबत तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (एसीबी) तक्रार केली होती. त्यानुसार शनिवारीच एसीबीने कारवाई करुन दोघांना अटक केली.

शनिवारी दुपारी सातार्‍यात आयुक्‍त दर्जाच्या अधिकार्‍याला लाचप्रकरणी अटक झाल्याने खळबळ उडाली. पोलिसांची कारवाई झाल्यानंतर घटनास्थळाचा पंचनामा करण्याची प्रक्रिया राबवण्यात आली असता यावेळी विनय सुलोचने यांच्याकडे लाचेच्या रकमेव्यतिरिक्‍त आणखी 70 हजार रुपये सापडले. संबंधित रक्‍कमही पोलिसांनी जप्‍त केली व त्याबाबत चौकशी करण्यात आली.

रविवारी दोन्ही संशयितांना जिल्हा न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली होती. सोमवारी न्यायाधिशांनी विनय सुलोचने व सविता दातीर यांना प्रत्येकी 50 हजार रुपयांच्या सॉल्वन्सीवर जामीन मंजूर केला. तसेच पुढील तपासासाठी सातारा एसीबी विभागात दर मंगळवारी हजेरी लावण्याचे आदेश करण्यात आले. बचाव पक्षाकडून अ‍ॅड.चंद्रकांत बेबले व अ‍ॅड.महेश यादव यांनी युक्‍तिवाद केला.

दरम्यान, पुणे व ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्या त्या ठिकाणी दोघा संशयितांच्या घरावर छापे टाकले आहेत. छाप्याबाबत अधिक माहिती मिळू शकली नसून संपत्तीची माहिती घेण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे सांगण्यात आले आहे. या घटनेचा पुढील तपास पोनि आरिफा मुल्‍ला करत आहेत.

अन्‍न औषध प्रशासनाच्या भानगडी बाहेर येणार

अन्‍न औषध प्रशासनाने अनेक प्रकरणांमध्ये केलेल्या भानगडी बाहेर येणार आहेत. गर्भपात औषधसाठा प्रकरणामध्ये कायद्याच्या विभागाला हातात घेऊन मोठ्या प्रमाणात तोड झाली. अन्‍न औषध प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी व पोलिस दलातील अधिकार्‍यांनी सेटलमेंट करून प्रकरण दाबले. अन्‍न औषध प्रशासनातील अधिकार्‍यांनी मेडिकलवाल्यांना वेठीस धरले आहे. याबाबतच्या अनेक तक्रारी आता सुरू झाल्या असून या कारवाईमुळे तक्रारींना वाचा फुटली आहे. अन्‍न औषध प्रशासनातील आणखी काही अधिकारी व कर्मचारी ‘रडार’वर असल्याचे समजते.