Sat, Aug 24, 2019 21:30होमपेज › Satara › घाटातील किंकाळ्यांनी जिल्हा हादरला

घाटातील किंकाळ्यांनी जिल्हा हादरला

Published On: Jul 29 2018 1:25AM | Last Updated: Jul 28 2018 10:51PMशाहूपुरी : वार्ताहर

महाबळेश्‍वर-पोलादपूर दरम्यानच्या अंबेनळी घाटात शनिवारी  सकाळी झालेल्या भीषण अपघातात मृत्यूने जणू काही थयथयाटच केला. सह्याद्रीच्या कडेकपारीतील दरीमध्ये भेदरुन टाकणार्‍या किंकाळ्यांनी अवघा जिल्हा हादरुन गेला. भयावह अपघातातील मृतांचा आकडा ऐकताच जिल्हावासियांच्या काळजाचा ठोकाच चुकला. या घटनेने जिल्ह्यात आजपर्यंत झालेल्या भीषण दुर्घटनांच्या कटू स्मृतीही जागा केल्या. 

पोलादपूर अपघातात तब्बल 32 जण ठार झाल्याचे समजताच अवघा जिल्हा भेदरला. सकाळपासून अवघ्या जिल्हाभर या अपघाताचीच चर्चा सुरू होती. सोशल मीडियावरही या अपघाताचे वृत्त पसरले. शनिवारची सकाळ दु:खाचा डोंगर घेऊनच उजाडली. जो तो या अपघाताचीच माहिती घेत होता. त्यामध्ये आपलं जवळचं, लांबचं कोणी नाही ना? याची खात्री केली जात  होती. त्यासाठी अनेकांची धडपड सुरु होती.  अपघातानंतर अवघ्या काही मिनिटांच्या आतच फेसबुक, ट्विटर आणि व्हॉट्सअप या सोशल मीडियावर घटनेची माहिती फिरू लागली. त्यामुळे क्षणार्धात या माहितीची देवाण- घेवाण झाली. सर्वच व्हॉटस्अप ग्रुपवर अपघाताचे फोटो, मृत आणि जखमींची नावे पडत होती. या अपघातामध्ये कोणाचे वडील, कोणाचा भाऊ तर कोणाचा मुलगा हिरावून नेला होता. संवेदनशील मने त्यामुळे हळहळली. 

या अपघाताने जिल्ह्यातील अपघातांची मालिकाच नजरेसमोर आली.  जिल्ह्यातील गेल्या तीन वर्षांची रस्ते अपघातामधील आकडेवारी बघितली तर अंगावर काटा आणणारीच ठरली. खंडाळा तालुक्यातील एस कॉर्नरची तरी बळींची भूक काही केल्या भागत नसल्याची आठवणही या घटनेने वेदना देवून गेली. याशिवाय सातारा तालुक्यातील वळसे फाटा, खिंडवाडी या परिसरातील अपघातात कित्येक जणांनी आपला जीव गमावल्याचे दुखद प्रसंग डोळ्यासमोर तरळले. 

जिल्ह्यात 2016 ते 2018 जून अखेर 1276  रस्ते मोटार अपघातात 408 जण मृत्यूमुखी तर 1421 जखमी झाले आहेत.  या दुर्घनांमुळे स्थानिक लोकांनी प्रशासनाविरोधात आंदोलने करुन अपघात कसा टाळता येईल यावर उपाययोजना करण्यासाठीच्या मागण्याही कित्येक वेळा झाल्या मात्र प्रशासनाने नेहमीच या अपघाती क्षेत्रात मलमपट्टी लावण्या पलिकडे कोणतीही ठोस पावले उचलेली दिसून येत नाहीत. 

जिल्ह्यातील काही भयावह घटना

सातारा जिल्ह्यात यापूर्वीही अनेक भयावी रस्ते अपघात झाले आहेत. पोलादपूरच्या अपघाताने पुन्हा एकदा या दुर्घटना समोर आल्या. 9 एप्रिल 2018 ला खंडाळ्याजवळील एस काँर्नरवर आयशर टेम्पो अपघातात 18 ठार 17 जखमी झाले होते. तर खंडाळ्याजवळ कंटनेरखाली जीप चिरडून 11 ठार झाले होते. तसेच पसरणी घाटात गुजरात येथील ट्रॅव्हल्स पलटी होवून 33 ठार झाले होते तर 5 जून 2016 ला पनवेल येथे निखिल ट्रॅव्हल्सच्या अपघातात सातारा जिल्ह्यातील 17 ठार झाले होते. अशा अनेक भीषण अपघातांमुळे सातारा जिल्हा हादरवून गेला होता.